लातूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शाळा-महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागत असल्याने पालकांचा अतिरिक्त खर्च वाढला असून, मोबाईल, टॅब, इंटरनेट, लॅपटॉपवर खर्च करावा लागत आहे. नेटवर दोनशे तर मोबाईलसाठी साधारण १५ ते २० हजार रुपयांचा खर्च प्रत्येक पालकाला करावा लागला आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीची विद्यार्थी संख्या ५ लाख ५० हजार २३४ इतकी आहे. यातील दहावीची विद्यार्थी संख्या ४७ हजार २९४ आहे तर बारावीची ३६७ हजार ४१८ इतकी आहे. या दोन वर्गांचा विचार केला तर प्रत्येक पालकांना ५० हजारांच्या पुढे साहित्य खरेदीसाठी खर्च करावा लागला आहे. नववी ते पहिलीपर्यंत घरातील कोणत्याही सदस्याच्या मोबाईलवर काही पालक भागवत आहेत, तर काही पालकांनी स्वतंत्र खर्च केला आहे. एकंदर, ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे. प्रस्तुत विद्यार्थी संख्या मराठी माध्यमांच्या शाळांची आहे. इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांवर तर पालकांना यापेक्षा अधिक खर्च करावा लागला आहे.
मोबाईल, संगणक आणि इंटरनेट
गेल्या दोन वर्षांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन शिकवणी वर्ग आहेत. त्यामुळे प्रत्येक पाल्याला मोबाईल किंवा संगणक द्यावा लागला आहे. त्यासाठी इंटरनेटचा खर्च वाढला. महिन्याला किमान दोनशे रुपये इंटरनेटवर खर्च होतो.
इंटरनेट पॅक संपल्यानंतर वर्ग बंद होण्याची भीती असते. त्यामुळे पॅक संपण्याअगोदर बॅलन्स टाकण्यासाठी मुलांची पालकांकडे मागणी होत आहे. प्रत्येक घरामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
मुलगी अकरावीला आहे. आता तिने लॅपटॉपची डिमांड केली आहे. मोबाईलवर त्रास होतो, असे तिचे म्हणणे होते. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करावा लागला. ५० हजारांच्या पुढे खर्च आला. पर्यायच नसल्यामुळे लॅपटॉप घ्यावा लागला. - बालाजी होदाडे
मोबाईल, इंटरनेटचा खर्च वाढला असून, मुलांची अडचण होऊ नये म्हणून दोघांसाठी दोन मोबाईल घ्यावे लागले. त्यासाठी आर्थिक झळ सोसावी लागली. मोबाईल घेतला नसता तर त्यांचे वर्ग बुडाले असते. ऑनलाईन शिक्षणाशिवाय सध्या तरी पर्याय नाही. - साहेबराव निकाळजे
मुलांची एकाग्रता कमी
स्क्रीन टाईम वाढल्यामुळे मुलांची एकाग्रता कमी होण्याचा धोका आहे. लॉकडाऊनमुळे त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज बंद झाल्या आहेत. मित्रांशी संवादही कमी आहे. त्यामुळे त्यांच्यात चिडचिडेपणा येतोय. ऑनलाईन शिक्षणामध्ये नॉर्मल स्कूलचे वातावरण नाही. तिसऱ्या लाटेचे पालकांनी जास्तच मनावर घेतल्याने मुलांना बाहेर सोडले जात नाही. याचाही मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. - डॉ. आशिष चेपुरे, मानसोपचार तज्ज्ञ
पहिली ४६,७७८
दुसरी ४६,७३३
तिसरी ४६,२२१
चौथी ४७,६९९
पाचवी ४९,२१५
सहावी ४८,४८८
सातवी ४९,६३७
आठवी ४९,२९३
नववी ४८,४६५
दहावी ४७,२९४