लातूर : प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी धडपडत असते. माणसाचे व्यक्तिमत्त्व खुलण्याचे पहिले स्थान हे शरीरच. त्यामुळे शरीराला सुडौल बनविण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. लाॅकडाऊनच्या काळात घरी बसलेल्या अनेक नागरिकांनी लाॅकडाऊननंतर व्यायामाचा आधार घेत वाढलेले वजन कमी करण्याचा हिवाळ्याच्या माेसमात घाट घातला आहे. त्यामुळे लातूर शहरातील मैदानासह जीम, योगा सेंटर हाऊसफुल्ल आहेत. कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन पुकारण्यात आला. जवळपास सहा महिने हा लाॅकडाऊन होता. त्यामुळे व्यायामाची हौस असणारी मंडळी घरातच होती. काही जणांनी घरच्या घरी व्यायाम करीत आपली दैनंदिनी कायम ठेवली. मात्र, मैदानावरील घाम गाळण्याचा आनंद काही औरच. व्यायामाला मैदान ही पहिली पसंती आहे. यासह जीम, योगा सेंटर, वाॅकिंग ट्रॅकवरील वाॅकिंग, एरोबिक्स, झुंबा, पोहणे आदी ठिकाणी नागरिक व्यायामाला पसंती देतात. विविध खेळांच्या माध्यमातूनही शरीराला व्यायाम होतो. कोरोनामुळे घरीच बसून असल्याने वजन वाढले. त्यामुळे लाॅकडाऊननंतर नागरिकांनी परत नव्या जोमाने व्यायामाला सुरुवात केली. सहा महिन्यांत वाढलेले वजन कमी करण्याचा घाट लाॅकडाऊननंतर अनेकांनी घातला. त्यामुळे मैदाने फुलू लागली आहेत. हिवाळ्यात व्यायामासाठी नेहमीच गर्दी असते. हिवाळ्यातील व्यायाम शरीराला मानवत असल्याने, तसेच लाॅकडाऊनमधील वजन कमी करण्याचा चंग बांधल्याने मैदानासह वजन उतरविण्याचे अनेक सेंटर सध्या हाऊसफुल्ल आहेत.
संकल्प केलेल्यांची गर्दी...
नवीन वर्ष म्हटले की, नवनवीन संकल्प आपण बाळगतो. २०२१ ला सुरुवात झाली. व्यायामाचा संकल्प केलेल्या युवक, युवती व नागरिकांमुळे मैदाने फुलून गेली आहेत.
आहार तज्ज्ञांचाही घेतात सल्ला...
वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत पोषक आहाराची गरज असते. त्यामुळे वजन वाढलेले नागरिक आहार तज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचेही या काळात दिसत आहे. व्यायाम व उत्तम आहार घेतला तर वजन योग्यरीत्या कमी होते, असे लातूरचे आहार तज्ज्ञ नितीन लहाने यांनी सांगितले.