लातूर : प्राचीन काळी भारत विकसित जीवन जगत होता. सध्याही विश्वगुरू बनण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच त्यात समाजाचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढविला जात आहे. समाजाचे स्वास्थ्य मजबूत ठेवून प्राचीन आणि आधुनिक ज्ञानाच्या जोरावर भारत निश्चितच विश्वगुरू बनेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे मंगळवारी व्यक्त केला.
विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या कॅन्सर टर्सरी केअर सेंटरच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन मंगळवारी लातुरात झाले. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, टाटा कॅन्सर रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र बडवे, डॉ. अनिल अंधोरीकर, डॉ. ब्रीजमोहन झंवर यांची उपस्थिती होती. यावेळी मोहन भागवत म्हणाले, प्राथमिक उपचार गावातच मिळाले पाहिजेत. आरोग्य सेवा सुलभ आणि स्वस्त असायला हवी. यामुळे समाज सुदृढ होईल. डॉक्टरांचा धर्म सेवा देणे आहे. पैसा कमविणे नाही. डॉक्टरांची चिकित्सा सर्वरोग निदान करून सेवेची असायला पाहिजे. आता आधुनिक उपचारपद्धत आली आहे. त्याला आयुर्वेदसारख्या प्राचीन उपचारपद्धतीची जोड दिली तर ते आणखीन आरोग्याच्या दृष्टीने सुलभ होईल. परंपरा, देशभक्ती, भाव जागरण केल्यामुळे मोठे परिवर्तन होईल, असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, डॉ. राजेंद्र बडवे, डॉ. अनिल अंधोरीकर यांची समायोचित भाषणे झाली.
२२ जानेवारीला संपूर्ण देश एक झाला...हिंदू समाजाला एकत्र करण्याचे काम आम्ही सातत्याने करीत आहोत. एवढ्या मोठ्या समाजाला एकत्र करणे अवघड काम आहे. मात्र अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने भारत देशातील हिंदू समाज एक झाला होता. परंपरा, श्रद्धा अन् देशभक्तीची भावना यामुळे जागृत झाली, असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
मोठे परिवर्तन होईल..दिवे लावणे, थाळ्या वाजविणे यामुळे कोरोना पळत नाही. अशी तथाकथित बुद्धिवाद्यांनी टीका केली.परंतु या कृत्यातून समाजमनामध्ये लढण्याची भावना तयार होते. जिद्द निर्माण होते. देशभक्ती, परंपरा आणि भावनेचा जागर झाल्यास मोठे परिवर्तन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.