हरी मोकाशे, लातूर : भारतीय सैन्य दलातील जवान शादुल निजामसाब शेख (३५) हे आसाममध्ये कर्तव्यावर असताना शनिवारी शहीद झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी तालुक्यातील चेरा मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
जळकोट तालुक्यातील चेरा येथील गरीब कुटुंबातील शादुल निजामसाब शेख हे सन २०१० मध्ये भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर रुजू झाले होते. ते गेल्या १३ वर्षांपासून सैन्य दलात कार्यरत होते. सध्या ते आसाम राज्यातील तेजपूर जिल्ह्यात कर्तव्य बजावत होते. दरम्यान, अचानक ते गंभीर आजार पडल्याने त्यांच्यावर तेथील सैन्य दलाच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातच त्यांची ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार...
शहीद शादुल निजामसाब शेख यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ९ वाजता हैदराबादमार्गे चेरा येथे आणण्यात येणार आहे. गावातील चौकात अंत्यदर्शन घेतल्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी दिली.
गावावर शोककळा...
चेरा येथील शादुल निजामसाब शेख हे शहीद झाल्याची माहिती रविवारी सायंकाळी गावात मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.