लातूर : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन व्हावे, यासाठी लातूर पाेलिसांनी कडक धाेरणाचा अवलंब केला आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात आराेपीविराेधात २४ तासांच्या आत न्यायालयामध्ये दाेषाराेपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पाेलिसांनी सांगितले, ६ जुलै राेजी निलंगा तालुक्यातील कासारशिरसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील दाेघा आराेपींनी एका २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केला. शिवाय, पीडित महिलेच्या पतीला शिवीगाळ केली हाेती. याबाबत कासारशिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कासारशिरशी पोलिसांना या गुन्ह्यात २४ तासांत तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, निलंगा उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रियाज शेख, गोरख घोरपडे यांनी तपास पूर्ण केला. शिवाय, २४ तासांत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले.