लातूर : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साेयाबीनचे दर ५३०० रुपयांवरुन ५ हजार १०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे आवकही घटली आहे. सोमवारी बाजार समितीत ५७९९ क्विंटलची आवक झाली. त्याला ५२३३ रुपयांचा कमाल, ४९३० रुपयांचा किमान मर ५१०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला आहे.
सोयाबीनचे दर वधारतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी घरीच सोयाबीनची साठवणूक केली आहे. लातूर बाजार समितीमध्ये सोमवारी गहू १२३ क्विंटल, रब्बी ज्वारी १४, हरभरा १० हजार ७९३, तूर ८००, मूग २, उडीद ३६, एरंडी १, करडई ३५४, चिंच १३७ तर ४६ क्विंटल चिंचोक्याची आवक झाली. तर गव्हाला २४५५, रब्बी ज्वारी ४ हजार, हरभरा ४६५०, तूर ८१५०, मूग ६७००, उडीद ६९००, एरंडी ५ हजार, करडई ४३००, चिंच १२ हजार तर चिंचोक्याला १ हजार ४०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला.
जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक असल्याने खरिपात सर्वाधिक पेरा असतो. अतिवृष्टी आणि गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. सध्या बाजारातील दरही घसरलेले असल्याने उत्पादन खर्चही हाती पडतो की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची घरीच साठवणूक केली आहे. आगामी काळात तरी दर वधारतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे. त्याचा परिणाम आवकवर होत आहे.
तुरीला मिळतोय उच्चांकी दर...बाजार समितीत ८०० क्विंटल तुरीचा आवक झाली. त्याला ८३०० रुपयांचा कमाल, ७४०१ रुपयांचा किमान तर ८ हजार १५० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला आहे. हा दर उच्चांकी असून, सध्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक १० हजार क्विंटलवर पोहचली असून, दरही स्थिर असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.