लातूर : सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल हरिकिशन लोया यांच्या मृत्यूची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, असा ठराव लातूर जिल्हा वकील मंडळाने शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. ठरावाची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान व सरन्यायाधीश तसेच मुख्यमंत्री, राज्यपाल व मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पाठविण्यात येणार आहे.मूळचे लातूरजवळच्या गातेगाव येथील रहिवासी असलेल्या लोया यांचा ३० नोव्हेंबर २०१४ रोजी मध्यरात्री नागपूर येथे मृत्यू झाला होता़ ते एका लग्न सोहळ्यासाठी तेथे गेले होते. सोहराबुद्दिन शेख चकमक खटल्याचे ते प्रमुख न्यायाधीश होते.लोया यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. यासंदर्भात प्रसारमाध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या अनुषंगाने जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड़ अण्णाराव पाटील यांच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष अॅड़ नामदेव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली़अॅड़ उदय गवारे यांनी लोया यांच्या मृत्यूच्या संदर्भात चौकशी करण्याचा ठराव मांडला़ त्यास अॅड़ बळवंत जाधव यांनी अनुमोदन दिले़जिल्हा वकील मंडळाचे सर्व सदस्य, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे शिष्टमंडळ यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकाºयांना भेटून निवेदन देतील, असेही अॅड़ गवारे यांनी सांगितले़ उपाध्यक्ष अॅड़ नामदेव काकडे, सहसचिव अॅड़ प्रदीपसिंह गंगण हे पदाधिकारी व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते़
न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 5:43 AM