औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरात दरवर्षीच्या पावसाळ्यात मांजरा- तेरणा नदी संगमाशेजारी पूरस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टरवरील शेती पिकांचे व शेतीचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे. या समितीने बुधवारी नदीपात्रात भेट देऊन तांत्रिक पाहणी केली.
लातूर जिल्ह्यातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहतात. मांजरा धरण प्रकल्पाखाली धाराशिव जिल्ह्यात एक व लातूर जिल्ह्यात १४ अशी एकूण १५ बंधारे आहेत. हे बंधारे कर्नाटक सीमेपर्यंतच्या १४८ किमी अंतरावर बांधण्यात आलेले आहेत. याशिवाय तेरणा प्रकल्प खालील बाजूस तेरणा नदी पात्रावर धाराशिव जिल्ह्यात एक तर लातूर जिल्ह्यात ९ असे एकूण १० बंधारे आहेत. मांजरा व तेरणा नद्यावर एकूण २५ बंधारे सिंचनासाठी कार्यान्वित आहेत.अतिवृष्टीच्या काळात पुराच्या पाण्यामुळे या दोन्ही नदीशेजारील आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नेहमी नुकसान हाेते. त्यामुळे बॅरेजेसची उंची व संरक्षण भिंत बांधण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केल्याने महाराष्ट्र शासनाने या कामासाठी तांत्रिक सदस्य टीम नियुक्ती केली आहे. त्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी पाठपुरावा केला हाेता.
या शासकीय टीमचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य अभियंता विजय घोगरे हे असून समितीत अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, अधीक्षक अभियंता इ.म. चिस्ती, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, लातूरचे कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, कार्यकारी अभियंता एस. व्ही. वाघमारे, कार्यकारी अभियंता आर.पी. मोरे हे आहेत. या टीमने बुधवारी औराद शहाजानी येथील मांजरा व तेरणा नदी संगमावर भेट देऊन पाहणी केली. याशिवाय, तगरखेडा उच्चस्तरीय बंधारा, औराद उच्चस्तरीय बंधारा, वांजरखेडा कोल्हापुरी बंधारा, कर्नाटक हद्दीतील काेंगळी उच्चस्तरीय बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. हे पथक क्षेत्रीय परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना तसेच प्रत्यक्ष पाहणीचा अहवाल लवकरच सादर करणार आहे. दरम्यान, यापूर्वीही वॉटर रिसर्च टीमने पाहणी केली होती.
बॅकवॉटरमुळे शेकडो हेक्टरचे नुकसान...दरवर्षी पावसाळ्यात मांजरा- तेरणा नदीस पूर येऊन संगमावर पूरस्थिती निर्माण होते. या नद्यांवरील उच्चस्तरीय बॅरेजचे अतिरिक्त पाणी सोडल्याने जलसाठा वाढून पूर वाढतो. दरम्यान, मांजरा नदीचे पात्र मोठे असल्याने आणि तेरणा नदीचे पाणी पुढे लवकर वाहत नाही. त्यामुळे तेरणा नदीचे पात्र बदलते आणि शेतकऱ्यांच्या शेतामधून हे पाणी वाहते. त्यामुळे काही किमीपर्यंत बॅक वॉटर तयार होतो व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेकडाे हेक्टर शेतीतील पिकांमध्ये पाणी घुसून नुकसान होते.