बार्शी रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी
लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौक ते महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांची रेलचेल असल्याने दुचाकी चालकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू झाले असल्याने विद्यार्थिनींची ये-जा सुरू असते. गतिरोधक तात्काळ उभारण्याची मागणी होत आहे.
कागदपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी
लातूर : सध्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कागदपत्रांची आवश्यकता असल्याने तहसील कार्यालयात तसेच सेतू सुविधा केंद्रावर गर्दी दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन काही प्रमाणात केले जात आहे. लातूर, औसा, निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ आदी तालुक्यांतील तहसील कार्यालयात प्रमाणपत्रांसाठी गर्दी दिसत आहे.
राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
लातूर : शहरातील दयानंद क्रिकेट स्टेडियमवर राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा २६ डिसेंबरपर्यंत होत आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर, कपिल माकणे, रणजीतसिंह पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती. विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील ५ हजार साधक होणार सहभागी
लातूर : मोक्षदा एकादशीला साजरा होणाऱ्या गीता जयंतीनिमित्त यावर्षी ७० देशांतील ५० हजार साधक एकाच वेळी भगवद्गीतेच्या बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे २५ डिसेंबर रोजी पठण होणार आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ५ हजार साधक सहभागी होणार आहेत. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन लक्ष्मीकांत कर्वा यांनी केले आहे. सहभागी होणाऱ्या भाविकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
शिक्षण उपसंचालक मोरे यांचा सत्कार
लातूर : लातूर विभागीय शिक्षण उपसंचालकपदी गणपत मोरे आणि प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी डी.ए. मोरे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्याबद्दल भोईसमुद्रगा येथील मुख्याध्यापक मैनोद्दीन शेख, मळवटी येथील युवराज शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांचा सत्कार
लातूर : सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांचा विलास कदम यांनी सत्कार केला. यावेळी के. श्रीकांत, तोडकर, शिंदे यांची उपस्थिती होती. विलास कदम सेवानिवृत्त झाले आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विलास कदम यांनी कार्य केले आहे.
तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी पुरवठा
लातूर : लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसामध्ये मोठ्या प्रमाणात आंतरपीक म्हणून हरभरा तसेच भाजीपाल्याची निवड केली आहे. या पिकांना पाणी देण्यासाठी तुषार सिंचन प्रणालीचा पर्याय शेतकऱ्यांनी अवलंबिला आहे. तसेच स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले जात आहे. रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके जोमात आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकांवर फवारणी केली जात आहे.
लक्षवेध करिअर मार्गदर्शन कार्यक्रम
लातूर : ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांकरिता लक्षवेध करिअर मार्गदर्शन कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला. यावेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीकांत, अभिजीत देशमुख, डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, ॲड. वैशाली लोंढे-यादव, डॉ. भास्करराव बोरगावकर, सुलेखा कारेपूरकर, ऋषिकेश दरेकर, प्रमोद वरपे आदींसह सदस्यांची उपस्थिती होती.
राजस्थान विद्यालयामध्ये गणित दिवस साजरा
लातूर : येथील श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. प्रारंभी थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक कामाळे, किलचे, उंदीरकिल्ले यांनी मार्गदर्शन केले. तसेच नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणित प्रयोग सादर केले. कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत कर्वा, लक्ष्मीकांत शिरुरे, उपमुख्याध्यापक सुरेश बंग, सुश्री चेतना शहा, भागवत भोसले आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
वळसंगी येथून म्हशीची चोरी, गुन्हा दाखल
लातूर : शेतातील आखाड्यावर बांधलेली म्हैस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना वळसंगी येथे घडली. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी अविनाश भरत येरगे यांनी आपल्या शेतातील आखाड्यावर म्हैस बांधली होती. मात्र, शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक फौजदार कांबळे करीत आहेत.