निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वसलेल्या उस्तुरी येथील सुनील मुळे यांनी शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून बजावलेली २५ वर्षांची सेवा दखलपात्र ठरली आहे. ज्या गावात ते जातील तेथील शाळेचे रूपडेच बदलून टाकतात. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाबाबत गाेडी निर्माण करून, त्यांना घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी अखंडपणे सुरू ठेवला आहे. शेती-माती आणि शिक्षणाला अधिक महत्त्व देणाऱ्या मुळे गुरुजींची धडपड शिक्षणक्षेत्रात नक्कीच बदल करणारी ठरली आहे. चिंचाेली भंगार येथील प्राथमिक शाळेत त्यांनी केलेल्या प्रयाेगातून विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढीला लागली आहे. एका मिनिटात हजेरी हा उपक्रमही त्यांनी राबविला आहे. त्यासाठी मैदानावर विद्यार्थ्यांना काेड देण्यात आले आहेत. एका मिनिटात काेणता विद्यार्थी गैरहजर आहे, याची माहिती समाेर येते.
पहाटे अभ्यास सुरू...
दरदिन विद्यार्थ्यांना पहाटे ५ वाजता उठविण्यासाठी ते पाठपुरावा करतात. आता सध्याला गावातील विद्यार्थी पहाटे पाच वाजता उठून अभ्यासाला बसतात. यासाठी त्यांनी ऑनलाइन संपर्क साधणे, प्रत्यक्ष फाेन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, शिवाय विद्यार्थ्यांना याेगाचेही ते धडे देतात. त्यासाठी पहाटे ५.३० ते ७.३० या कालावधीत याेगशिबिर घेतले जाते. अवघड विषय साेप्या पद्धतीने सांगण्याची कल्पकता त्यांनी यशस्वी करून दाखविली आहे.
गीतमंचचा उपक्रम...
संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा गीतमंच त्यांनी शाळेत निर्माण केला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीला अधिक बळ मिळाले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना काेराेनाकाळात शिक्षणाचे धडे दिले आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देत, अडचणीवर मात करण्याचेही बळ त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पेरले आहे.