लातूर : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यासाठी व यावर अभ्यास करुन अहवाल देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सन १९६७ पूर्वी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत. ही सर्व माहिती एकत्रित करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केली जाणार आहे.
सन १९६७ पूर्वी प्रवेशित असलेल्या मुलांची जात कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा या जातीचा उल्लेख असलेले प्रवेश निर्गम उतारे रजिस्टरच्या नोंदीनुसार जिल्हा परिषद व खासगी शाळाकडून माहिती घेऊन सादर करायचे आहेत. विनाविलंब ही माहिती शिक्षण विभागाकडे सादर करावी लागणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे हा अहवाल पाठविला जाणार आहे.
तहसील यंत्रणाही लागली कामाला...मराठा समाजाच्या महसूली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळातील संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, मराठा समाजातील लोकांची वंशावळ याबाबीची माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयांना आतापर्यंत कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी किती जणांनी अर्ज सादर केले, त्यापैकी किती जणांना प्रमाणपत्र देण्यात आले, याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे तहसीलसह शिक्षण विभागाची यंत्रणाही जुने दस्ताऐवज तपासणीच्या कामाला लागले आहेत.