लातूर : शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडून, दोन लाखांची रोकड पळविल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील बसस्थानक परिसरात दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातील कर्मचारी रविंद्र विश्वभरराव काळे (५४ रा. चिंचपूर ता. भूम जि. उस्मानाबाद) हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी १० वाजता कार्यालय उघडण्यासाठी आले होते. दरम्यान, कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप, कोंडी तुटलेले आढळून आले. हे कार्यालय सुटीनिमित्त १७ फेब्रुवारीपासून बंद होते. कार्यालय बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कार्यालयातील तिजोरी फोडून आत ठेवलेले रोख १ लाख ९० हजार ६८४ रुपयांची रोकड लंपास केली. घटनास्थळी गांधी चौक पोलीस, श्वान पथकाने भेट देवून पाहणी केली आहे. याबाबत मंगळवारी सायंकाळी रविंद्र काळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्नेहा पिंपरखेडे हे करीत आहेत.
वर्दळीचा परिसर...बसस्थानक परिसरत असलेले इन्शुरन्स कार्यालय हे वर्दळीच्या भागात आहे. घटनास्थळापासून गांधी चौक पोलीस ठाणे जवळच आहे. व्यापारी पेठा आणि बसस्थानकाचा परिसर असल्याने येथे सतत वर्दळ असते. शिवाय पोलीसांचीही गस्त असते. अशा परिसरात अज्ञात चोरट्यांनी हे कार्यालय फोडून दोन लाखांची रोकड पळविल्याने खळबळ उडाली आहे.