लातूर : ‘नीट’मध्ये गुणवाढ करून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थी, पालकांना गंडविणाऱ्या आरोपींचा दिल्लीतील साथीदार गंगाधर सीबीआयच्या ताब्यात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. दरम्यान, लातूर, उमरगा (धाराशिव), सोलापूर, देगलूर (नांदेड) अशी साखळी असलेल्या प्रकरणाचा पुढील छडा सीबीआय लावणार असल्याचे गुरुवारी सूत्रांनी सांगितले.
लातुरातील आरोपी जिल्हा परिषद मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण आणि सोलापूर येथे शिक्षक असलेला संजय जाधव या दोघांनाही २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी आहे, तर मुख्याध्यापक व शिक्षकाशी समन्वय साधणारा मूळचा देगलूरचा इरण्णा कोनगलवार अद्यापि हाती लागलेला नाही. दिल्लीतून हैदराबादमार्गे लातूरशी संपर्क करणारा आरोपी गंगाधर सीबीआयच्या जाळ्यात अडकल्याचे सूत्र सांगत आहेत. लातूर पोलिसांचे पथक झारखंड, उत्तराखंड, दिल्ली अशा सर्व ठिकाणी जाऊन प्रकरणाच्या मुळाशी तपास करीत आहे. त्याच दरम्यान गंगाधरचा ताबा मिळाल्यानंतर लातुरातील ज्या पालकांनी सबएजंट, आरोपी मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडे पैसे दिले, त्याचे पुढे काय झाले? गंगाधरने दिल्लीतून पुढे नेमके काय केले आणि कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ झाला का, हा तपासाचा भाग आहे. ज्या ज्या पालकांनी लातूरमध्ये जबाब दिले, त्यानुसार काहींना ॲडव्हान्स घेतलेले ५० हजार रुपये मिळाले, तर काहींना परत देतो असे आरोपीने सांगितले होते. परंतु, प्रत्यक्ष काम झालेले नाही, आतापर्यंतच्या तपासात कोणत्याही विद्यार्थ्यांचे गुण वाढलेले आढळून आले नाही.
ज्या विद्यार्थी, पालकांचे प्रवेशपत्र पोलिसांकडे आहेत, त्याच्या आधारे त्या त्या विद्यार्थ्यांचा निकाल आणि गंगाधरचा जबाब यावरून सत्य बाहेर येईल. दरम्यान, गंगाधर पोलिस यंत्रणेच्या ताब्यात नाही, मात्र सीबीआयने त्याला ताब्यात घेतले असल्याची दाट शक्यता आहे, असा दुजोरा सूत्रांनी दिला.