राजकुमार जाेंधळे / लातूर: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर येथील सृष्टी जगताप हिने सलग १२६ तासांपेक्षा अधिक काळ नृत्य करून ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ करत जागतिक विक्रम नाेंदविला आहे. याची दखल घेत राष्ट्रपती भवनच्या वतीने सृष्टी जगताप हिला भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे. बुधवार, ६ सप्टेंबर राेजी राष्ट्रपती भवन येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिचा सत्कार केला जणार आहे. यावेळी लातूरचे खासदार सुधाकरराव शृंगारे, सृष्टीचे आई- वडील आणि लहान बहिणीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती राष्ट्रपती भवनच्या वतीने देण्यात आली.
लातुरात झाला विश्वविक्रम...
स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त लातुरातील दयानंद सभागृहात सलग १२६ तास नृत्य करुन लातुरातील सृष्टी जगताप हिने एक इतिहास रचला. तिने या माध्यमातून ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ करत विश्वविक्रम नाेंदविला आहे. याची दखल आता राष्ट्रपती भवनकडून घेण्यात आली आहे.