लातूर : खरीप हंगामात जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्र चालकांनी नियमाप्रमाणे बी-बियाणे, खतांच्या साठ्याच्या नोंदी न ठेवणे, दुकानाच्या दर्शनी भागात भावफलक लावले नसल्याचे आढळून आल्याने तालुकास्तरीय कृषी अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या होत्या. त्यातील ३२ केंद्र चालकांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसमोर गुरुवारी सुनावणी झाली. आता जिल्हास्तरीय समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम हा हुकमी मानला जातो. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची भिस्त खरिपावर अवलंबून आहे. या हंगामाच्या कालावधीत बोगस बी-बियाणे, खते, कीटकनाशके विक्री होण्याची भीती अधिक असते. याशिवाय, जादा दराने विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नसते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर एक आणि प्रत्येक तालुकास्तरावर एक अशी एकूण ११ पथके नियुक्ती केली होती. या पथकांनी जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी केली. तेव्हा काही त्रुटी आढळून आल्या.
३५ केंद्र चालकांना नोटिसा...बी-बियाणे, खते खरेदीचे बिल नसणे, बियाणे, खतांच्या स्त्रोताची माहिती न ठेवणे, सेवा केंद्राच्या दर्शनी भागात भावफलक न लावणे, प्रत्यक्ष विक्री आणि नोंदीत तफावत आढळून येणे अशा प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याने ३५ केंद्र चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर खुलासा सादर करण्यासाठी आठवड्याची मुदत देण्यात आली होती.
३२ केंद्र चालकांचे खुलासे...जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नोटिसा बजावण्यात आलेल्यांची सुनावणी झाली. तेव्हा ३२ केंद्रचालक उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी मिलिंद बिडबाग, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संतोष लाळगे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
नियमानुसार कारवाई होणार...सुनावणी झालेल्या ३२ कृषी सेवा केंद्र चालकांचे खुलासे जिल्हास्तरीय समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर समितीच्या निर्णयानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाई होईल.- संतोष लाळगे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक.