लातूर : मुरुड येथील एक सोन्या- चांदीच्या दुकानात काम करणाऱ्या कारागिरानेच दागिने चोरुन पलायन केल्याची घटना २३ जुलै रोजी घडली होती. दरम्यान यातील आरोपीला मोठ्या शिताफीने पकडण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीतील सोन्याच्या दागिन्यासह तब्बल १५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, मुरुड येथील सोन्या-चांदीचे व्यापारी २३ जुलैरोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ज्वेलर्स दुकानातील कारागिराला दुकानात बसवून जेवणासाठी घराकडे गेले होते. दरम्यान, दुकानातील शोकेसमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दुकानातील कारागीर सुग्रीव उर्फ बाळूकुमार बावकर (रा. दत्तनगर, मुरुड) याने लंपास करत पलायन केले. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला केला होता. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तपासाबाबत आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या दोन पोलीस पथके आरोपीच्या शोधात रवाना झाले.
आरोपी सतत जागा बदलत होता...चोरीतील आरोपी हा पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सतत जागा बदलून फिरत होता. त्याची माहिती काढून पोलीस पथके विविध ठिकाणी त्याच्या मागावरच होते. आरोपी पुणे येथे असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. या माहितीवरून पोलीस पुणे येथे रवाना धडकले. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच आरोपी पुणे येथून लातूरच्या दिशेने बसमधून पळून जात असल्याचे पोलिसांना समजले.
सापळा लावून पोलिसांनी पकडले...तर दुसऱ्या पथकाने मुरुड बस स्थानकात सापळा लावून, पुण्याकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनावर नजर ठेवली. दरम्यान, सुग्रीव उर्फ बाळूकुमार बावकर हा मुरुड बस स्थानकात आलेल्या एका बसमधून उतरून तोंड लपवून एका ऑटोत बसताना दिसला. त्याला पोलिसांनी पकडले.
१५ लाखाची बॅग लागली हाती...जाळ्यात अडकलेल्या आरोपीकडील बॅगची तपासणी केली असता, सोन्याच्या दागिन्यासह तब्बल १५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.