लातूर : जिल्ह्यातील बालाजी वाडी (ता.देवणी) येथील एका ४८ वर्षीय व्यक्तीचा खून करुन, कमरेला दगड बांधून मृतदेह कॅनलमध्ये टाकल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी बाभळगाव शिवारात घडली. या खुनाचे २४ तासात बिंग फुटले असून, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. याबाबत लातूर ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, देवणी तालुक्यातील बालाजी वाडी येथील अरविंद नरसिंगराव पिटले (वय ४८) हे १० ऑक्टोबरपूर्वी गायब झाले होते. दरम्यान, लातूर तालुक्यातील बाभळगाव शिवारातील कॅनलच्या पाण्यावर पुरुष जातीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती लातूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटली. शिवाय, त्याच्या खिशात मोबाईल आढळून आला. मारेकऱ्यांनी खून करून, पुरावा नष्ट करण्यासाठी कमरेला दगड बांधून तो मृतदेह कॅनलमध्ये फेकून दिला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. पहिल्यांदा मयताच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पहिल्यांदा पत्नीने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक खोलात विचारपूस केली असता, गुन्ह्याचा भांडाफोड झाला.
पत्नी सुनीता पिटले हिचे आणि सुभाष साहेबराव शिंदे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याने मयत अरविंद पिटले हा आपल्या पत्नीला सतत भांडत होता. या भांडणामुळे पत्नी सुनीता आणि प्रियकर सुभाष शिंदे यांनी अरविंदचा काटा काढण्याची योजना आखली. जवळपास ८ ऑक्टोबर रोजी अरविंद पिटले याचा खून करण्यात आला असावा. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी हात-पाय बांधून, कमरेला पिशवीत दगड बांधून तो मृतदेह कॅनलच्या पाण्यात फेकून दिले. अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी दिली. याप्रकरणी मयताची पत्नी सुनीता आणि सुभाष साहेबराव शिंदे या दोघांना पोलीस पथकाने अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कदम, पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील, अंमलदार उत्तम देवके, सचिन चंद्रपाटले, राहुल दरोडे, अनिल जगदाळे, यादव, आळणे यांच्या पथकाने केली.