लातूर : राज्यातील प्रमुख बाजारपेठामध्ये लौकिक असलेल्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी जगदीश बावणे तर उपसभापतीपदी सुनील पडिले यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात अग्रेसर आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी गेल्या महिन्यात निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील कृषी विकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. त्यामुळे बाजार समिती सभापती व उपसभापतीपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता लागली होती.
पीठासन अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक एस.आर. नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालकांची बैठक मंगळवारी झाली. यावेळी सभापती पदासाठी जगदीश बावणे यांचा तर उपसभापती पदासाठी सुनील पडीले यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे सभापतीपदी बावणे यांची तर उपसभापती पदी पडले यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती ललितभाई शहा, रवींद्र काळे, अड. समद पटेल, बाजार समितीचे सचिव भगवान दुधाटे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.