जळकोट येथील मोंढ्यात जवळपास ६० अडत दुकानांची संख्या आहे. तालुक्यातील ४७ गावांतून येथे माल विक्रीसाठी आणला जातो. मात्र, यंदा अतिवृष्टीने सोयाबीन हातचे गेले. त्यानंतर तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव पडला. अनेक गावांतील तुरीचा खराटा झाला असून, ज्वारीही काळी पडली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. परिणामी, माेंढ्यातील आवक घटली आहे. हमालांना काम नसल्याने प्रपंचाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्याची परिस्थिती अवघड असल्याचे जळकोट बाजार समितीचे प्रशासक अमोल वाघमारे, सचिव बालाजी उगिले यांनी सांगितले. एकंदरीत जळकोट तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. तुरीचे पंचनामे झाले नाहीत, शिवाय, मदतही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. तुरीचे पंचनामे करून त्याची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
आवक घटल्याने राेजगारही नाही...
जळकाेट येथील बाजार समितीत दरदिन तूर आणि साेयाबीनची आवक अत्यल्प आहे. परिणामी, लाखाे रुपयांच्या घरात हाेणारी उलाढाल आता हजारांच्या घरात आली आहे. दिवसाला किमान ५०० पाेत्यांची आवक अपेक्षित आहे. त्या तुलनेत केवळ १० टक्के म्हणजेच ५० पाेत्यांची आवक हाेत आहे. जवळपास ४५० ते ६५० पाेत्यांची आवक घटली आहे. यातून हमाल, मापाड्यांच्या हाताला काम नाही. परिणामी, त्यांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.