राजकुमार जाेंधळे / लातूर : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीहल्ला केल्याचा लातूर जिल्ह्यात विविध भागांत समाजबांधवांच्या वतीने निषेध करण्यात आली. रेणापूर, औसा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लातूर शहरात शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. दुचाकी रॅली काढून शहराच्या विविध भागांत बंदचे आवाहन करण्यात आले. याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दिवसभर दुकाने बंद ठेवली. तसेच रेणापूर येथे पिंपळफाटा येथे रास्ता राेको आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी आंदोलकांनी केली.
लातूर शहरात बाजारपेठ बंद...
लातूर शहरासह जिल्ह्यातील औराद शहाजानी येथील बाजारपेठ, आडत बाजार बंद ठेवण्यात आला हाेता. दरम्यान, दिवसभर उलाढाल ठप्प झाली हाेती. शिवाय, लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून धावणाऱ्या अनेक बसेफेऱ्याही महामंडळ प्रशासनाने रद्द केल्या. परिणामी, लातूर येथील आगारात शेकडाे बसेच जाग्यावरच थांबल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.