लातूर : वलांडी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देऊन पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी सोमवारी हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या वतीने करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
पीडित कुटुंबीयास शासनाच्या वतीने समाजकल्याण विभाग, मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक मदत करावी, पीडितेच्या पुनर्वसनासह शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाने करावा, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे, विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम यांची नेमणूक करावी. पीडित कुटुंबीयात अल्पवयीन ४ मुली, १ मुलगा असल्याने सर्व बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत मदत करावी, समाजकल्याण विभागांतर्गत उदरनिर्वाहासाठी शेतजमीन देण्यात यावी, घरकुलाचा लाभ देण्यात यावा, संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला गावबंदी करण्यात यावी आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनआंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आदींना मागण्यांचे निवेदन दिले. तसेच पोलिस अधीक्षक, महिला व बालकल्याण विभाग, सहायक आयुक्त समाजकल्याण यांनाही निवेदन देण्यात आले. गंजगोलाई येेथून काढण्यात आलेला मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर महिलांनी निवेदनाचे वाचन केले.