लातूर : मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मागणीची दखल घेत राज्य शासनाने शिक्षण, नोकरीत १० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करावे. मी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांना आवाहन करतो, असे खा. सुनील तटकरे यांनी येथे गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच आमची भूमिका आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता सरकारने स्वतंत्र आरक्षण दिले आहे. त्यामुळे आता समाजाला न्याय मिळाल्याचे सांगत खा. तटकरे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही ४५ पेक्षा अधिक जागा जिंकणार आहेत. अद्याप जागा वाटपाची कसलीही बोलणी झालेली नाहीत. पुढील आठवड्यात ती होणार आहेत.
याबाबतचा अधिकृत निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेतील. कोण कुठली जागा लढवायची हे चर्चेतून पुढे येईल. पत्रकार परिषदेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, शिक्षक आ. विक्रम काळे, सुरज चव्हाण, ॲड. व्यंकट बेद्रे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, मुर्तुजा खान, बबन भोसले, पंडित धुमाळ, प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.
बारामतीकर अजितदादांसोबत... -इतिहास बदलण्याची ताकद असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बारामतीकरही आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ते स्पष्ट होईल. त्यांच्यासोबत असलेले सर्व आमदार मोठ्या फरकाने सहजपणे विजयी होतील, असा दावा प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केला.