डोंगरशेळकी येथून दुचाकी लंपास, गुन्हा दाखल
लातूर - डोंगरशेळकी परिसरातून एमएच २४ एएन ९७७६ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी फिर्यादी व्यंकट विठ्ठल नादरगे (३५, रा. डोंगरशेळकी) यांच्या तक्रारीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पुढील तपास पोना. कसबे करीत आहेत.
नंदकुमार बालुरे यांचे विद्यापीठ परीक्षेत यश
लातूर - येथील प्रा. नंदकुमार बालुरे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या एम.ए. शिक्षणशास्त्र अंतिम वर्ष परीक्षेत यश मिळविले आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. सुधाकर कुलकर्णी, प्रा. प्रदीप करंजीकर, प्रा.डॉ. गोपाळ पवार, प्रा.डॉ. सुधीर भूमकर, प्रा.डॉ. जीवन जाधव, प्रा.डॉ. सुशिला पिंपळे, प्रा.डॉ.यु.एस. चवंडके, डॉ. सर्वेात्तम मांदळे यांनी कौतुक केले आहे.
शासकीय वसतिगृह सुरू करण्याची मागणी
लातूर - जिल्ह्यातील अकरावी, बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेली शासकीय वसतिगृहे सुरू करावीत, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रीतम दंडे, अजितराज गंगावणे, प्रेम घोबळे, सागर अडसुळे, विशाल गायकवाड, रवि इंगळे, महेश कांबळे, प्राची भोसले, शुभांगी कांबळे, पवन कांबळे, हेमंत कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ऑनलाईन दुग्ध व्यवसाय, शेळीपालन कार्यशाळा
लातूर - महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र लातूरच्या वतीने २२ ते २७ डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुट पालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते ५० वयोगटांतील व शैक्षणिक पात्रता किमान ७ वी पास असणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी कार्यशाळेस सहभाग नोंदवावा, असे आवाहन समन्वयक महेश कानडे, प्रकल्प अधिकारी एन.एम. भोसले यांनी केले आहे. या कार्यशाळेत डेअरी फार्म, गाय, म्हैस पालन, पदार्थ निर्मिती, पशुधन लसीकरण, विमा योजना आदींवर मार्गदर्शन केले जाणार आहे.