लातूर : भरधाव वेगातील काळी पिवळीने ब्रेक न लागल्याने महामार्गावर थांबलेल्या एका स्कूल बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास लातूर - औसा रोडवरील किडस् इन्फाे पार्क शाळेनजिक घडली. या अपघातात काळी पिवळीतील पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लातूर- औसा महामार्गावरील पेठनजिक किडस् इन्फो पार्क शाळा आहे. या शाळेच्या समोर बुधवारी सकाळी स्कूल बस (एमएच १२, एफसी ९२४७) ही उभी होती. दरम्यान, लातूरहून औश्याकडे बुधवारी सकाळी प्रवाशी घेऊन काळी पिवळी (एमएच २४, एफ १४९५) भरधाव निघाली होती. तेव्हा समोर स्कूल बस थांबल्याचे पाहून काळी पिवळी चालकाने वाहनास ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, अचानकपणे ब्रेक न लागल्याने काळी पिवळीने स्कूल बसला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात काळी पिवळी चालक बालाजी जाधव (रा. चांडेश्वर) याच्यासह अन्य चौघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती लातूर ग्रामीण पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.