लातूर : महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या एका आरोपीच्या लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, सोन्याचे दागिने असा २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूरसह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अलिकडे मोबाईल, महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने आरोपींची शोध मोहिम सुरू केली.
खबऱ्याने माहिती दिली अन् चोरटा लागला गळाला
लातूर जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. दरम्यान, खबऱ्याने पथकाला माहिती दिली. चोरलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आरोपी फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एकाला ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली. त्याची झाडाझडती घेत नाव विचारले असता, शिवाजी सुभाष घोलप (वय ३३, रा. जागजी जि. धाराशिव) असे नाव सांगितले.
महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली...
आरोपीने आपल्या इतर महिला साथीदारांच्या मदतीने गत काही महिन्यांपासून लातूर शहरसह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत बस मधून चढणाऱ्या-उतरणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार लातूर जिल्ह्यात औसा ठाण्यात मंगळसूत्र चोरीचे दोन गुन्हे, गांधी चौक पोलिस ठाण्यात एका गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून चोरलेले सोन्याचे तीन मंगळसूत्र, गंठण आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बसस्थानकातून केली एकाला अटक...
मंगळसूत्र, सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील एकाला पोलिस पथकाने लातुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून अटक केली. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. प्रवीण राठोड, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, तुराब पठाण, जमीर शेख, मोहन सुरवसे, चंद्रकांत डांगे, रामहरी भोसले, रवी कानगुले, संतोष खांडेकर, सचिन मुंडे, आळणे यांच्या पथकाने केली आहे.