राजकुमार जाेंधळे, लातूर : जिल्ह्यातील हातभट्टी निर्मिती करणाऱ्या, अवैध दारूविक्री हाेणाऱ्या गावातील बेराेजगार तरुण पारंपरिक अवैध व्यवसायाबराेबरच गुन्हेगारीकडे वळू नयेत, यासाठी पाेलिसांनीच आता पुढाकार घेत राेजगार मेळावा भरविला असून, मुंबई-पुण्यातील माेठ्या कंपन्यांमध्ये ४८ तरुणांना नाेकरीची संधी मिळाली आहे.
लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा पोलिस दल व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर यांच्या वतीने कसारशिरसी श्री करी बसवेश्वर विद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात १४० मुलांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, ४८ जणांना प्राथमिक निवडपत्र देण्यात आले आहे. मुंबई-पुण्यासह लातुरातील ८ कंपन्यांनी, स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य / कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या पाच महामंडळांनी मेळाव्यात सहभाग नाेंदविला. उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रता, आवडीच्या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. यावेळी निलंगा येथील उपविभागीय पाेलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, जिल्हा कौशल्य विभाग लातूरचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आभार सहायक पाेलिस निरीक्षक रियाज शेख यांनी मानले.
गुन्हेगारी विश्वातून बाहेर काढण्याचे प्रयत्न...
या भागातील काही तरुण पारंपरिक अवैध हातभट्टी गाळणे, त्याची विक्री करण्यात गुंतलेले आहेत. त्यांना उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, याेग्य दिशा देण्यासाठी राेजगार मेळावा घेण्यात आला. बेरोजगारी वाढल्याने तरुण वाममार्ग, गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पोलिस दलाच्या निदर्शनास आले. या तरुणांना योग्य रोजगार मिळावा, त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.