लातूर : बेकायदेशीरपणे गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्याला लातूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील प्रकाश नगरातील चंद्रोदय कॉलनीत राहणाऱ्या जितेंद्र तुकाराम जाधव (वय ५१) यांच्याकडे अवैध गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतुसे असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. झाडाझडती घेत कसून चौकशी करून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याला गुरुवारी लातूर येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास एमआयडीसी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप कराड करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, खुरर्म काझी, रवी गोंदकर, दीनानाथ देवकाते, यशपाल कांबळे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी यांच्या पथकाने केली आहे.