आशपाक पठाण, लातूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कार्यरत असलेल्या राज्यातील जवळपास ३ हजार ५०० आशा गटप्रवर्तकांना मिळणारे मानधन प्रवास खर्चालाही पुरत नसल्याने मुलांच्या शिक्षणासह, संसार चालवायचा कसा, असा प्रश्न निर्माण आहे. गतवर्षी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी मासिक १० हजार रूपये मानधन वाढीची घोषणा केली. प्रत्यक्षात एक हजार वाढीचा अध्यादेश काढला. त्यामुळे गटप्रवर्तकांच्या संसाराचे गणित कोलमडले आहे. हिवाळी अधिवेशन झाले, पण निर्णय न झाल्याने गटप्रवर्तकांची निराशा झाली आहे.
गटप्रवर्तकांच्या प्रश्नाबाबत ११ जून रोजी कृती समितीने मुंबई येथे आरोग्य सहसंचालक बोरकर व राज्य समन्वयक स्वाती पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये मोबदल्यात वाढ मिळावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, एप्रिल २०२४ पासून केंद्राचा मोबदला मिळालेला नाही तो द्यावा, राज्य शासनाने मोबदल्यात केलेली वाढ ५ जून २०२४ च्या जीआर नुसार मोबदला त्वरित द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २ जुलै रोजी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनावर गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढीव मोबदला मिळावा, यासाठी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी १० हजार वाढीव मोबदल्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात अध्यादेश काढताना त्यात केवळ १ हजार वाढ देण्यात आली. त्यामुळे गटप्रवर्तकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
उसनवारीवर चालतो घरगाडा...
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कार्यरत असलेल्या आशा गटप्रवर्तकांना केंद्रातील दहा ते बारा गावांना भेटी देऊन आशा स्वयंसेविकांच्या कामाचा आढावा घ्यावा लागतो. विविध योजनांची माहिती देत ते काम वाढविण्यासाठी आशांना प्रेरीत करावे लागते. मासिक बैठक घेऊन आशांनी केलेल्या कामाची नोंदी घेऊन त्यांचे मानधन काढणे आदी कामे करावे लागतात. एका गटप्रवर्तकाकडे किमान २० ते २५ आशांच्या कामाची जबाबदारी आहे. दिवसेंदिवस काम वाढतच चालले आहे, महागाई वाढल्याने घर खर्च भागविणे कठीण झाले आहे. सध्या मिळणारे मानधन एकत्रित मिळत नाही, त्यामुळे उसनवारीवर घरगाडा चालवावा लागतो, असे सांगण्यात आले.
हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढला पण...
आशा गटप्रवर्तक कृती समितीचे भगवानराव देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. आशांना ५ हजार वाढ दिली पण कामाचा अधिक भार असलेल्या गटप्रवर्तकांना १ हजार वाढ करून चेष्टा केली आहे. दहा हजार वाढीची घोषणा त्यांनीच केली होती. आता त्याची अंमलबजावणी करावी म्हणून राज्यस्तरावर कृती समितीकडून पाठपुरावा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लवकरच वाढीव मोबदल्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.