चाकूर (जि़ लातूर) : लातूर- नांदेड महामार्गावरील खड्डयांच्या दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीने बुधवारी चापोली येथील महामार्गावर झोपा काढो आंदोलन करण्यात आले़. यावेळी चक्क महामर्गाचे काम बघणाऱ्या अभियंत्यालाच खड्ड्यात बसवून आंदोलन कर्त्यांनी संताप व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ़. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले़. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी मनसेच्यावतीने यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते़. तेव्हा महामार्ग प्राधिकरणच्या अभियंत्यांनी खड्डे बुजविण्याचा नुसताच दिखावा केला.
आंदोलनात मनसेचे तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी, कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख यश भिकाणे, जनार्धन इरलापल्ले, तुळशीदास माने, मारुती पाटील, शिवशंकर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि आंदोलनकर्ते सहभागी झाले होते.
दुरुस्तीचे काम सुरु झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पावित्रा मनसेने घेतला होता़. तहसीलदार डॉ़. शिवानंद बिडवे यांनी मध्यस्थी करीत प्राधिकरणच्या अभियंत्यास बोलावून घेतले़ तेव्हा संतप्त कार्यकर्त्यांनी अभियंत्यालाच खड्डयात बसविले़. लेखी आश्वासनानंतरच अभियंत्याला खड्डयातून उठण्याची परवानगी मिळाली.