- तुकाराम मोरेभालकी : कर्नाटकातीलकाँग्रेस सरकारने शनिवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यात बिदर जिल्ह्यास दोन मंत्री पदे मिळाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज मंत्रीमंडळ विस्तार केला.
कर्नाटकात विधानसभेची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत बिदर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार जागांवर भाजपाचे तर दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. आज बंगळूरूमधील राजभवनात मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात बिदर जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन्ही आमदारांना संधी मिळाली आहे. भालकी मतदारसंघातील चौथ्यांदा निवडून आलेले काँग्रेसचे आ. ईश्वर भीमण्णा खंड्रे यांचा राज्यातील मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. ईश्वर खंड्रे हे कल्याण भागातील लिंगायत समाजाचे प्रबळ नेते आहेत. यापूर्वीही ते एकदा मंत्री होते. आता दुसऱ्यांदा त्यांना संधी मिळाली आहे.
तसेच बीदर मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या आ. रहीम खान यांनाही राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रहीम खान हेसुध्दा चौथ्यांदा विजयी झाले असून ते दुसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. पहिल्यांदाच बिदर जिल्ह्यातील दोन आमदारांची मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात काँग्रेसचे दोनच आमदार असून त्यांनाही मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाला आणखीन गती मिळण्याची आशा वाढली आहे. दरम्यान, आ. ईश्वर खंड्रे आणि आ. रहीम खान यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.