लातूर : पक्षकाराला जलद, सुलभ आणि कमी खर्चात न्याय मिळावा, यासाठी न्यायव्यवस्थेतील प्रत्येक घटकाने कटिबद्ध राहावे, असे प्रतिपादन कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी येथे केले. लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने दयानंद सभागृहात न्या. प्रसन्ना वराळे, न्या. मंगेश पाटील, न्या. शिवकुमार डिगे, न्या. वृषाली जाेशी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी न्या. वराळे म्हणाले, ई-फायलिंग, पेपरलेस न्यायदान प्रक्रिया यासाठी सामाेपचाराने सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील. काळाची पावले ओळखून तंत्रस्नेही व्हावे लागेल. व्यवस्थेतील सर्वांचे उदिष्ट पक्षकाराला जलद, सुलभ व कमी खर्चात न्याय मिळणे हे आहे. यावेळी न्या. वराळे यांनी लातूर शहरातील महाविद्यालयीन जीवन, साहित्य, शिक्षण, संगीत, नाट्यक्षेत्रातील काही प्रसंग सांगितले. अभ्यासू ज्येष्ठ विधिज्ञांकडून मिळालेले कायद्याचे ज्ञान, अवांतर वाचनातून मिळालेली प्रगल्भता, वडिलांची शिकवण, गुरुजनांचा आदर्श, मित्रांची साथ या सर्वच बाबींचे माेल न्या. वराळे यांनी उदाहरणांसह सांगितले.
प्रास्ताविकात ॲड. अण्णाराव पाटील यांनी ई-फायलिंगचा मुद्दा वकिलांच्या बाजूने मांडला. तसेच साेशल मीडियातून आता न्यायाधीशांनाही ट्राेल केले जाते. हा गंभीर मुद्दा असून, न्यायव्यवस्था, न्यायमूर्ती हे आदरस्थानी आहेत, याची जाणीव पुन्हा-पुन्हा करून देण्याची गरज आहे. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा काेसमकर, ॲड. मिलिंद पाटील, ॲड. विठ्ठल देशपांडे, ॲड. संग्राम देसाई यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन इरफान शेख, प्रियांका देशपांडे यांनी केले.
तंत्रज्ञान आत्मसात करायावेळी न्या. मंगेश पाटील यांनी जगाच्या वेगासाेबत राहावे लागेल. त्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करा. ई-फायलिंग प्रक्रिया अंगीकारावी लागेल, असे आवर्जून नमूद केले. तसेच सत्काराबद्दल लातूरकर आणि वकील मंडळाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
पक्षकार हाच केंद्रबिंदू न्या. शिवकुमार डिगे म्हणाले, पक्षकार हा केंद्रबिंदू आहे. त्यांची सहायता करणारे केंद्र स्थापित करण्याची गरज आहे. न्यायमूर्ती वराळे यांचा लातुरातील सहवास अनेकांना समृद्ध कराणारा राहिला आहे. ते उत्तम वक्ते, कवी आणि माणुसकीचे दर्शन घडविणारे उत्कृष्ट न्यायमूर्ती आहेत, असे गाैरवाेद्गार न्या. डिगे यांनी काढले.
न्यायदानाची शिकवण न्या. वृषाली जाेशी म्हणाल्या, न्यायदेवतेच्या डाेळ्यावर पट्टी आहे. त्याचे अनेक अर्थ सांगितले जातात. माझ्या मते प्रभावीपणे मांडलेली बाजू बाह्यचक्षू अनुभवत असतात. परंतु अंत:चक्षू जागृत करुन न्यायदान प्रक्रियेची शिकवण त्या प्रतीकातून मिळते.