लातूर : शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. परिणामी, लातूरनजीक असलेल्या कातपूर तलाव १०० टक्के भरले असून, यंदाही तलाव ओव्हरफ्लाे झाल्याने परिसरातून शेतकऱ्यांत समाधान व्यक्त हाेत आहे. सध्याला गत दाेन दिवसांपासून सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने, लातूर ते कव्हा मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. परिणामी, या मार्गावरील वाहतूक मंगळवारी सायंकाळी काही तासांसाठी बंद हाेता. कव्हा येथील गावकऱ्यांनी पर्यायी मार्ग म्हणून औसा राेड, खाेपेगावत-कव्हा या मार्गाचा वापर केला. या तलावात लातूर लगतच्या चांडेश्वर, कन्हेरी, खाेपेगाव, वासनगाव आणि औसा रिंग राेड परिसरातील छाेट्या-छाेट्या नाल्यातून येणारे पाणी जमा हाेते.
दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यातील तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टी झाली आहे. परिणामी, परिसरातील नदी-नाले आणि पाझर तलावात माेठ्या प्रमाणावर जलसाठा झाला आहे.
सलग दुसऱ्या वर्षी तलाव भरला...गतवर्षी परतीच्या पावसामुळे तलावात १०० टक्के पावसाचा साठा झाला हाेता. दरम्यान, गतवर्षीही कातपूर तलाव ओव्हरफ्लाे झाला हाेता. यंदाही सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ओव्हरफ्लाे झाल्याने, परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
पुलाची उंची वाढविण्याची गरज...लातूर ते कव्हा मार्गावर तलावाच्या खालील भागात असलेल्या पुलाची उंची कमी आहे. परिणामी, थाेडासाही पाऊस झाला की, या पुलावरून पावसाचे पाणी वाहते. त्यामुळे काही काळासाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद हाेताे. यामुळे ग्रामस्थांची हेळसांड हाेत आहे. या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थातून हाेत आहे.