ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 24 - मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीसंदर्भात चौकशी करण्यासाठी गेलेल्या तीन नागरिकांना शाळेतील एक शिक्षकच झोपी गेल्याचे निदर्शनास आल्याची घटना निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु़) येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारी सकाळी घडली. शालेय वेळेतच शिक्षक झोपी गेल्याचे पाहून नागरिकांनीच आपले पाऊल मागे घेतले.
अंबुलगा बु़ येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शाळा आहे. प्रशालेत दहा शिक्षक अध्यापनाचे कार्य करतात़ नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी शाळा भरली. प्रत्येक वर्गात शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत होते. दरम्यान, गावातील जगदीश सगर, धनराज माने आणि उमेश होरे हे तिघे आपले पाल्य दररोज शाळेत येतात की नाही, तसेच त्यांची शैक्षणिक प्रगती कशी आहे, असे विचारण्यासाठी गेले होते.
हे तिघे पालक थेट शाळेच्या कार्यालयात गेले़ तेव्हा सहशिक्षक व्यंकट पाटील हे चक्क झोपी गेल्याचे दिसून आले़ त्यामुळे या पालकांनी मुख्याध्यापक कक्षाकडे धाव घेऊन शिक्षक शाळेतच झोपी गेल्यासंदर्भात तक्रार केली़ सदरील शिक्षकावर कार्यवाही करावी, असा पावित्रा घेतला़ त्यामुळे तब्बल तासभर शाळेत गोंधळच उडाला होता़ त्यामुळे विद्यार्थीही आचंबित झाले होते़
समज दिली जाईल
यासंदर्भात मुख्याध्यापक गणेश तुबाकले म्हणाले, सदरील शिक्षकास समज दिला जाईल़ यापुढे असा प्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रस्तावही पाठविला जाईल़
थकवा आल्याने डुलकी
मी दररोज लातूरहून ये- जा करतो़ आज शनिवार शाळा असल्याने लवकर आलो़ त्यामुळे थकवा जाणवू लागल्याने कार्यालयात बसलो होते़ तेव्हा डुलकी लागली आणि तिथे झोपी गेल्याचे सहशिक्षक व्यंकट पाटील म्हणाले.