गत पाच वर्षांच्या काळात महिला सरपंच म्हणून भाग्यश्री ज्ञानोबा चामे यांनी उत्कृष्ट कार्य करून राज्यात गावाचा नावलौकिक केले. त्यामुळे या गावास राज्य शासनाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होताच, सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू झाली. आनंदवाडी गावाच्या पंचक्रोशीत ही आनंदवाडी गावात यंदा निवडणूक होते की, बिनविरोध याकडे जनतेचे लक्ष लागले होते, परंतु गाव कारभारी एकत्रित येत ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. जेमतेम सातशे लोकवस्ती असणाऱ्या या गावाने गावात दवंडी देऊन ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज मागविले. यात गावातील १४ जणांनी ग्रामपंचायतीमध्ये आपली निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याची नोंद केली. त्यानंतर, संपूर्ण गावाने चावडीत एकत्रित बैठक घेऊन सर्व गावकऱ्यांशी विचारविनियम करून ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. महिलांना काम करण्याची संधी दिल्यास व त्यांना वेळोवेळी पुरुषांनी सहकार्य केल्यास त्या चांगल्या रीतीने सक्षमपणे काम करू शकतात, याची प्रचिती मागील पाच वर्षांच्या काळात आले असल्याने, यंदाही सर्व सदस्य म्हणून केवळ महिलांना संधी देण्याचा निर्णय घेऊन सात सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये ६ महिलांची बिनविरोध निवड करण्यात आली. एक जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने गावात कोणाकडेही अनुसूचित जमातीचे जातीचे प्रमाणपत्र प्रमाणित नसल्याने एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. आता पुन्हा आनंदवाडी गावाच्या विकासाची जबाबदारी महिलांकडे देऊन आनंदवाडी गावाने राज्यात आदर्श निर्माण केला आहे.
आनंदवाडी-गौरच्या सत्तेची चावी महिलांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:49 AM