अहमदपूर : भारतीय स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताकदिनी दरवर्षी खादीची आठवण होते. खादी हे वस्त्र नसून तो विचार मानला जातो. राज्य वेगवेगळ्या कार्यालयात शासन निर्णयानुसार खादी वेशभूषेसाठी सूचना केली असतानाही कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे खादी विक्रीला उतरती कळा आल्याचे दिसून येत आहे. त्यातच लॉकडाऊनचा मोठा फटका खादीला बसला आहे.
अहमदपूर तालुका खादी विक्रीत अव्वल होता. प्रत्येक शाळा व महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी खादीचा गणवेश वापरत असेल. येथील यशवंत विद्यालयाचे डी.बी. लोहारे गुरुजी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला खादीचा एक गणवेश केला होता. त्यामुळे येथे खादीची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली होती. अनेकजण खादीकडे आकर्षित होत हाेते. मात्र, लॉकडाऊनमुळे मार्च ते ऑक्टोबर दरम्यान खादीचे दुकान बंद असल्यामुळे व उत्पादनात घट झाल्यामुळे केवळ १८ हजार २०४ रुपयांची विक्री झाली. चालू वर्षात एकूण ३ लाख ७७ हजार ८२० रुपयांची विक्री झाली आहे.
मागील वर्षी हा आकडा ७ लाख १२ हजार ९७५ रुपये होता. खादी विक्रीमध्ये घट झाली आहे. खादी वापरणाऱ्यांची अनास्था वाढल्याचे दिसून येते. राज्य शासनाने प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी खादी गणवेश वापरावा, असे म्हटले आहे. गणवेश कोडही दिला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील दीड हजार शिक्षकांपैकी केवळ पाच शिक्षकांनी खादी गणवेश घेतला.
खादी वापरण्यास प्राधान्य द्यावे...
शासन निर्णयानुसार प्रत्येक शासकीय कर्मचा-यांनी आठवड्यातून एक दिवस किमान शुक्रवारी तरी खादी गणवेश परिधान करावा. पण त्याची अंमलबजावणी होत नाही. कार्यालय प्रमुखही त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे खादीची विक्री कमी झाली आहे. किमान राष्ट्रीय सणादिवशी तरी खादी वापरण्यास प्राधान्य द्यावे, असे खादी व्यवस्थापक ज्ञानेश्वर गव्हाणे म्हणाले.