लातूर : आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेत जिल्हास्तरावर लातूर तालुक्यातील कव्हा आणि अहमदपूर तालुक्यातील परचंडा या दोन्ही गावांना समान गुण मिळाल्याने दोन्ही गावे प्रथम आली आहेत. त्यामुळे बक्षीस विभागून देण्यात येणार असून प्रत्येकी ३० लाख मिळणार आहेत.
राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन, योजनांची अंमलबजावणी, ग्रामपंचायतीचे उत्पन्न, खर्च, सामाजिक दायित्व, वृक्षलागवड, बायोगॅस निर्मिती, सौर ऊर्जा, ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता व तंत्रज्ञान अशा काही मुद्द्यांच्या आधारावर सन २०२१-२२ च्या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १० गावांची तपासणी पथकामार्फत करण्यात आली.
या स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम कव्हा (ता. लातूर), बाेरगाव नं. (ता. औसा), कबनसांगवी (ता. चाकूर), वलांडी (ता. देवणी), विराळ (ता. जळकोट), परचंडा (ता. अहमदपूर), येळनूर (ता. निलंगा), सारोळा (ता. रेणापूर), थेरगाव (ता. शिरूर अनंतपाळ), नळगीर (ता. उदगीर) ही दहा गावे आली.या दहापैकी एका गावाची जिल्हास्तरावर निवडीसाठी पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यात कव्हा आणि परचंडा या गावांना समसमान गुण मिळाले. त्यामुळे या दोन्ही गावांना विभागून बक्षीस देण्यात येणार आहे.
तालुकास्तरावरील गावांना १० लाखांचे पारितोषिक...आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेत तालुकास्तरावर प्रथम आलेल्या गावांना प्रत्येकी दहा लाखांचे तर जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या दोन्ही गावांना प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. लवकरच पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी दिली.