बालाजी बिराजदार(लोहारा) जि. उस्मानाबाद : काही सेकंदात सर्वच नातीगोती पुसून टाकणारा भूकंप काय असतो, हे मला त्या काळरात्री समजले़ अवघ्या क्षणात माझ्या कुटूंबातील ९ जणांचा बळी गेला़ आजोबांच्या आग्रहाखातर घरालगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेला असल्याने मी वाचलो़ वाचलो खरे, पण त्यानंतर माझ्या वाट्याला आलेला संघर्ष, पोरकेपणाची भावना, झालेला आघात अजूनही पुसला जात नाही़ ती रात्र आठवली की मन विषन्न होते़ विचारचक्र पूर्णपणे थांबतात़ माझे स्वत्व विसरुन जायला होते, असे क्लेषमय कथन तावशीगड येथील गणेश बिराजदार यांनी केले़
भूकंपाच्या वेळी गणेश बिराजदार ९ वर्षांचे होते़ तोपर्यंत त्यांना भूकंप काय असतो, हे माहितही नव्हते़ त्यांच्या कुटूंबात त्यांच्यासह एकूण ११ जण होते़ त्या काळरात्री सर्वांनी भोजन घेतले अन् घरातच झोपण्यासाठी आपापल्या खोल्यांत गेले़ मात्र, आजोबांनी आग्रह केल्याने गणेश लगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपण्यासाठी गेला़ गाढ झोपेत असतानाच अचानक जमीन गडगडली अन् घर क्षणाधार्थ कोसळले़ घरात झोपलेले आई-वडील, बहीण, भाऊ, चुलते असे ९ जण माती-दगडाच्या ढिगाखाली दबले गेले़ यातून आईला बाहेर निघाली, पण ती गंभीर जखमी झाली होती़ तिला सोलापूरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते़ चार दिवसानंतर तिचाही मृत्यू झाला अन् गणेशच्या वाट्याला अनाथाचे जिणे आले़ तोपर्यंत काय चाललंय? हेच कळत नव्हते.
कुटुंबाच्या आठवणीने जीव होतो व्याकूळ...भूकंप झाला त्यावेळी गणेश बिराजदार हे केवळ नऊ वर्षांचे होते. भूकंप काय असतो, हे त्यांना माहीतही नव्हते. प्रलयंकारी घटनेत त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मृत्युमुखी पडले. त्यामुळे गणेश बिराजदार अनाथ झाले. आपल्या कुटुंबाची आठवण सांगताना ते म्हणाले, आई-वडिलांची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही. त्यांचे प्रेम, माया, वात्सल्य याला मी मुकलो आहे.