सूर्यकांत बाळापुरे
किल्लारी (जि़ उस्मानाबाद): प्रलयंकारी भूकंपानंतर लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यांतील हजारो मुले बेघर झाली. कोणाचे वडील गेले, तर कोणाची आई. तर अनेक जणांचे पालकत्वच हिरावले गेले. अशाच १२०० मुलांसमोर भारतीय जैन संघटनेने मदतीचा हात पुढे केला.
सारे काही संपले, असे आयुष्य ज्यांच्या वाट्याला आले त्यांनीही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेतली. पोरकेपण आलेल्या मुलांना जणू कुटुंबाचे छत्रच भारतीय जैन संघटनेने दिले. आज त्यातील अनेकांनी आपले आयुष्य कर्तृत्वाने फुलविले आहे. कोणी संशोधक आहे, कोणी प्राध्यापक झाले आहे, तर कोणी कृषी क्षेत्रात, व्यवसायात स्थिरावले आहे. भूकंपानंतर अनेक संस्था मदतीसाठी धावल्या होत्या. त्यातीलच भारतीय जैन संघटनाही पुढे आली होती. मुलांच्या भवितव्याचा विचार करून ज्यांची इच्छा आहे, त्या सर्वांच्या शिक्षणाची सोय केली. भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा, ‘आपलं घर’चे पन्नालाल सुराणा यांच्यासह कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला.
आपलं घर आणि एसओएस बालग्राम... च्एसओएस बालग्राम संस्थेनेही अनाथ मुलांना दत्तक घेतले. त्यांना बालग्रामध्ये आई-वडिलांचे छत्र मिळवून दिले. तिथल्या विशेष कुटुंब पद्धतीत मुले रमली. शिकून मोठी झाली. स्वावलंबीही बनली. तसेच राष्ट्र सेवा दल पुरस्कृत नळदुर्गच्या ‘आपलं घर’नेही भूकंपग्रस्त मुलांना आधार दिला. या सर्व संस्थांसह मदतीसाठी धावलेल्या सर्वांचेच ऋण किल्लारी आणि ५२ भूकंपग्रस्त गावकºयांच्या मनात हृदय करून आहेत.
स्वतंत्र पॅकेजसाठी भूकंपग्रस्तांचे साकडे...भूकंपानंतर ५२ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. घटनेला २५ वर्षे झाली, मात्र अद्याप अनेक समस्या कायम आहेत. या भागाच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी होत आहे. पुनर्वसित गावांमधील पायाभूत सोयी-सुविधा २५ वर्षांनंतरही तुलनेने सुधारल्या नाहीत़ रस्ते, नाल्या, पथदिवे, घरांची डागडुजी, पाणीपुरवठा योजना अशा प्राथमिक गरजाही पूर्ण करता-करता नाकी नऊ येत आहेत़ शिवाय, पुनर्वसनाच्या वेळी उद्यान, धोबीघाट, दवाखाने, शाळा अशा सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेचाही पूर्णपणे विकास झालेला नाही़ या बाबींची पूर्तता करण्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र पॅकेजची तरतूद करा, या मागणीसाठी भूकंपग्रस्तांची एकजूट झाली आहे.