- सुर्यकांत बाळापूरे
किल्लारी : भूकंपांचा केंद्रबिंदू ठरलेल्या किल्लारीसह लातूर-धाराशिव जिल्ह्यातील ५२ गावे विनाशकारी भूकंपाने उद्धस्त झाली. त्या संकटाला भूकंपग्रस्तांनी ज्या धैर्याने तोंड दिले आणि दानशूर संस्था, व्यक्तींनी मदतीचे हात पुढे केले त्यामूळे खेडी, घरे, माणसे उभी राहिली. त्यातून देशाने आपत्ती व्यवस्थापनाचा धडा घेतला. युनो, जागतिक बँकेने दखल घेतली. किंबहूना आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा आणि भविष्यात आलेल्या सर्व संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचे आत्मबळ हे किल्लारी भूकंपातून मिळाले असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी किल्लारीत व्यक्त केले.
भूकंपाला ३० सप्टेंबर रोजी ३० वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून भूकंपग्रस्त ५२ गावातील कृती समितीने संकटकाळात धावून आलेले तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा शनिवारी आयोजिला होता. यावेळी बोलताना खा. शरद पवार म्हणाले, कृतज्ञता ही काम करणाऱ्या संस्था, अधिकारी, व्यक्ती यांच्याप्रति असावी. मी जे काम केले ती जबाबदारी होती. हजारो लोकांनी मदतीचे हात पूढे केले होते. दातृत्व दाखविणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था होत्या.
भूकंपानंतर दोन तासात शरद पवार किल्लारीकडे...कृतज्ञता सोहळ्यात शरद पवार यांनी आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विसर्जन मिरवणूका झाल्याशिवाय झोपायचे नसते. पावणेचार वाजता परभणीचे विसर्जन झाल्याचा दूरध्वनी पोलीस अधीक्षकांचा आला. त्यानंतर मी झोपण्यासाठी निघालो. तितक्यात ३:५५ वाजता खिडक्यांची तावदाने वाजली. फर्निचर हादरले. भूकंपांची जाणिव झाली. लगेच विचारणा केली. किल्लारी केंद्र असल्याचे कळले. धक्का मोठा होता. लगेच पोहाचयला पाहिजे म्हणून लातूरचे तत्कालीन पालकमंत्री विलासराव देशमुख, धाराशिवचे पालकमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना सोबत घेऊन दोन तासांत किल्लारीकडे निघालो.
आक्रोश, धुळीने माखलेले गाव...किल्लारीत पोहोचलो तेव्हा आसमंत धुळीने माखला होता. आक्रोश होता. जिकडे-तिकडे प्रेतांचे ढिगारे होते. मन सुन्न झाले. एकट्या जिल्ह्यातील यंत्रणा पुरेशी नव्हती. शेजारच्या जिल्ह्यातून यंत्रणा मागविली. भूकंपग्रस्तांनी साथ दिली, दानशुरांनी मदत केली, संस्था, व्यक्ती पुढे आल्या, असे सांगत खा. शरद पवार यांनी शांतीलाल मुथा यांनी आई-वडील गमावलेल्या शेकडो मुलांचा सांभाळ केला. आपले घर यांनीही अशी अनाथ मुले सांभाळली. यावेळी पवार यांनी मुथा यांचा विशेष गौरव केला. त्यांच्या संस्थेत शिकवून देशात आणि विदेशात उच्च पदावर गेलेल्या भूकंपग्रस्त भागातील किशोर भोसले, बालाजी साठे, माधव माने, बालासाहेब कांबळे या युवकांचाही उल्लेख केला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख होते. तर मंचावर विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, खा. सुप्रिया सुळे, खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील यांची उपस्थिती होती. कृती समितीच्या वतीने सक्षणा सलगर व पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.