- निशिकांत मायी लातूर : सर्वत्र मृतदेहांचा सडा... उद्ध्वस्त झालेली घरे...कुठं आहे माझं घर... थांग लागत नाही... निव्वळ आक्रोश... काळोख... भूकंपाचे आज नाव जरी काढले तरी अंगावर काटा उभा राहतो... नकळत डोळ्यात अश्रू गर्दी करू लागतात... होय! साक्षीदार आहे मी या काळ्या घटनेची... डोळ्यासमोर काका-काकू आपल्या मुलांसह भिंतीत गाडल्या गेले... रत्नमाला अजय यादव बोलत होत्या.
काय करावं, कुणाला सांगावं...? कारण प्रत्येकाचीच ही रडकहाणी होती... किल्लारीच्या माहेरवाशीण असलेल्या पद्मा धनराज भोसले आज लातूरच्या यादव कुटुंबाच्या सूनबाई झाल्या आहेत. रत्नमाला यादव सांगतात, दु:ख आजही आहे. २५ वर्षे झाली, पण या घटनेची आठवण जरी झाली तरी रडून मोकळी होते.
त्या म्हणाल्या, पहाटे ३ वाजताच्या सुमारास काळाचा प्रघात झाला. वडील धनराज प्रल्हादराव भोसले व काका विद्याधर प्रल्हादराव भोसले... सोबत आजी-आजोबा आणि सर्व भावंडे. एकत्र कुटुंब सुखासमाधानानं राहात होतं. रत्नमालाचा कंठ दाटून आला. पाण्याचा घोट घेत बोलत्या झाल्या... आम्ही आईसोबत बाहेर अंगणात झोपलो. घराच्या आतल्या पडवीत काका, काकू, त्यांची दोन मुलं झोपली होती. डोळ्याला डोळा लागत नाही, तोच बॉम्ब फुटल्यागत मोठ्ठा आवाज झाला.
आई खडबडून उठली. काकांना जोऱ्याने आवाज दिला. दार बडवून बडवून त्यांना उठवलं. ते दाराची कुंडी काढण्यास आले... दार उघडले गेले... तेव्हाच पाठीमागील भिंत कोसळली. क्षणात मोठ्ठा धूर झाला... अंधार झाला... काहीच दिसेना... त्या भिंतीखाली काकू आपल्या मुुलांसह गडप झाली होती. दरम्यान, काकांनी दार उघडले खरे, पण तेही त्याच भिंतीखाली आले होते, कळलेच नाही कुणाला. दोन एकत्र कुटुंबातले एक कुटुंब या भूकंपाने उद्ध्वस्त झाले होते.