अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे गावच्या मध्यवर्ती भागात २ हेक्टर १९ आर जमिनीवर पोलीस ठाण्याची इमारत व पोलीस वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. ही इमारत साधारणतः १९३२-३३ च्या कालावधीत लोडबेरिंगची उभारण्यात आली आहे. इमारतीमध्ये सहा खोल्या असून, एक सहायक पोलीस निरीक्षक कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष, अभिलेख कक्ष, वायरलेस कक्ष, महिलांसाठी एक व पुरुषांसाठी एक लॉकऑफगार्ड, तसेच मुद्देमाल कक्ष आहे. सदरील इमारतीला तडे गेल्याने अभिलेख कक्ष व ठाणे अंमलदारांच्या कक्षास गळती लागत आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत आहे. त्यात एक अधिकारी व १७ कर्मचाऱ्यांसाठीची निवासस्थाने आहेत. या वसाहतीच्या परिसरात काटेरी झुडपे वाढली असून, गवतही उगवले आहे. वसाहतीत मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दारे, खिडक्या व छत मोडकळीस आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांना राहणे शक्य नसल्याने, बहुतांश पोलीस कर्मचारी इतरत्र भाड्याने राहत आहेत.
पोलीस ठाण्यातील अभिलेखा कक्षास गळती लागली आहे. ठाण्यातील काही रेकॉर्ड हे दोन, तीन, पाच, दहा वर्षांपर्यंत जतन केले जातात. नोंदवही ३० वर्षांपर्यंत जतन करावी लागते. या खोलीला गळती लागल्याने हे रेकॉर्ड भिजून खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका खोलीवर प्लास्टीक टाकून पावसापासून बचाव केला जात आहे. ठाणे परिसरात शौचालय बांधण्यात आले असून, त्याची दुरवस्था झाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृहाची सोय नाही. पाण्याचीही सोय येथे नाही. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
अहमदपूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारत बांधकाम करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, पुढे त्यावर काहीही हालचाल झालेली दिसून येत नाही. इमारत बांधणे आवश्यक आहे.
- शैलेश बंकवाड, सपाेनि. किनगाव.
040721\20210621_131842.jpg
पोलीस ठाण्याच्या इमागचा लागलेली गळती फोटो