केंद्र शासनाने १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना १ मेपासून लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे. अहमदपूर तालुक्यात एकूण १ लाख ५९ हजार ७७५ नागरिक असून त्यात ४० वर्षांपुढील ९२ हजार ४८२ आहेत. ४५ वर्षांपुढील जवळपास १६ हजार ४२७ नागरिकांनी लस घेतली असून काही नागरिक लस घेणे शिल्लक आहे. लसीकरण कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय, अंधोरी, हडोळती, किनगाव, सताळा, शिरूर ताजबंद या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चालणार आहे. लसीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी मतदानस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे मतदानस्तरीय अधिकारी प्रत्येक घरोघर जाऊन जागृती करीत असून लसीकरण व कोविडसंदर्भातील नियम सांगत आहेत. तसेच लसीकरणाचे फायदेही समजून सांगत आहे. याबाबतच्या सर्व सूचना मतदान अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी दिली.
नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद...
लसीकरण मोहिमेत १ मेपर्यंत ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस घेण्याविषयी जनजागृती केली जात आहे. त्यास तालुक्यातील धानोरा, ब्रह्मपुरी, सताळा या गावात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेत आहेत, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
जनजागृती महत्त्वाची...
४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यासंबंधीचा आदेश असला तरी अद्यापपर्यंत केवळ २ हजार ३०५ जणांनी कोविड लस घेतली आहे. ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या १० हजार ३५५ आहे. त्यामुळे ४५ वर्षांपुढील नागरिकांत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे डॉ. सुनील दासरे यांनी सांगितले.