लातूर : ज्या वाहनांवर किमान पाच हजारांवर दंड थकला आहे, अशा वाहनांना लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आता दंड थकलेल्या वाहनांची यादी तयार करणे, डेटा कलेक्ट करण्यासाठी विशेष माेहीम हाती घेण्यात आली आहे. गत आठ दिवसांत लातुरातील २०० वाहनांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे. लातुरात अशा पद्धतीने करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई असून, वाहनधारकांत खळबळ उडाली आहे.
लातुरातील बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहर वाहतूक शाखेचे पाेलिस निरीक्षक गणेश कदम यांनी चंग बांधला आहे. त्यासाठी त्यांनी विविध उपाययाेजना आखल्या असून, पहिल्या टप्प्यात गाेलाई परिसरातील अतिक्रमणाबराेबरच वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बेशिस्तपणे पार्किंग, वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्यांवर माेठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केली जात आहे. जानेवारी ते मेअखेरपर्यंत बेशिस्त वाहनधारकांना पाेलिसांनी चांगलाच धडा शिकविला आहे. वाहनांवर थकलेल्या दंडाच्या वसुलीसाठी पाेलिस निरीक्षक कदम यांनी विशेष माेहीम हाती घेतली आहे. चार महिन्यांत अनेक बदल त्यांनी घडवून आणले आहेत.
पाच हजारांचा दंड अन् काळ्या यादीत टाकणार...वाहनांवर पाच हजारांवर दंडाची रक्कम थकली असेल, तर पाेलिसांकडून ती रक्क्म भरण्याबाबत सतत एसएमएस केले जातात. संबंधित वाहनधारकांना ताेंडी, लेखी सूचना दिली जाते. शेवटी लाेकअदालतमध्ये तडजाेड करण्याची संधी दिली जाते. शेवळी न्यायालयातून नाेटीस पाठविली जाते. एवढे करूनही दंड नाही भरला तर अशी वाहने काळ्या यादीत टाकण्याची कारवाई पाेलिस करत आहेत.
थंड थकला तर थेट हाेणार कारवाई...वाहनधारकांनाे आपल्या वाहनांवर असलेला दंड त्या-त्यावेळी भरून घ्या. कारण थकलेल्या दंडाच्या वसुलीसाठी पाेलिस तुमच्याकडे पाठपुरावा करणार आहेत. शिवाय, न्यायालयाच्या वतीने नाेटीसही बजावणार आहेत. ज्या वाहनांवर माेठ्या प्रमाणावर दंड थकला आहे, अशांना मात्र ‘ब्लॅक लिस्ट’ची कारवाई केली जाणार आहे. यासाठी लातूर शहर वाहतूक शाखेने विशेष माेहीम हाती घेतली आहे.
१७० ऑटाे, ३० इतर वाहनांना दिला झटका...लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने किमान पाच हजारांचा दंड थकलेल्या १७० आणि ३० इतर अशा एकूण २००पेक्षा अधिक वाहनांवर काळ्या यादीची कारवाई केली आहे. ही यादी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आली आहे. भविष्यात पीयूसी प्रमाणपत्र, वाहनपरवाना नूतनीकरण, वाहन विक्री करताना आणि इतर कामासाठी अडचण येण्याची शक्यता आहे.