उदगीर :लातूर जिल्ह्यातील लातूर रोड रेल्वेस्टेशन येथे बायपास मार्गासाठी घरणी, मोहनाळ, वडवळ शिवारात जमीन मोजणी सुरू झाली आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत व गतिमान होण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने लातूर रोड येथे घरणी रेल्वेस्टेशन ते वडवळ रेल्वेस्टेशन बायपास मार्ग मंजूर केला आहे. या बायपासमुळे लातूर रोडहून परळीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या इंजिनची दिशा बदलणे टाळता येणार आहे. त्यामुळे वेळ व इंधनमध्ये बचत होणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वे प्रशासनाने जमीन अधिग्रहण करून देण्याची विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अहमदपूर येथील उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांना प्राधिकृत केले आहे. नुकतीच या मार्गावर जमीन मोजणी अधिकारी, रेल्वेचे अभियंता अभिनव कुमार यांच्या उपस्थितीत जमीन मोजणी सुरू केली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे बोर्डाचे सल्लागार सदस्य मोतीलाल डोईजोडे यांनी मागणी ते मंजुरीपर्यंत प्रयत्नशील आहेत.
लाइन टाकण्याचे काम सुरू होणार...या प्रकल्पासाठी २.०५४ किमी अंतराचे जमीन अधिग्रहण व ४६ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांनीही सहकार्य केल्यास लवकरच लाइन टाकण्याचे काम सुरू होईल. बायपास लाइनमुळे रेल्वे प्रवास अधिक गतिमान व सुलभ होणार असल्याचे डोईजोडे यांनी सांगितले. या कामी मोहनाळ परिसरातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रोहिदास वाघमारे यांचे सहकार्य लाभले आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथेही याचप्रकारे बायपास मंजूर असून, त्याचेही काम प्रगतिपथावर असल्याचे सांगितले.