निलंगा (जि. लातूर) : जम्मू- काश्मीरमधील श्रीनगर येथे कर्तव्यावर असताना शहीद झालेले जवान श्रीधर व्यंकटराव चव्हाण यांना गुरुवारी सकाळी तालुक्यातील हाडगा या मुळगावी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. भारत माता की जय, वंदे मातरम्, वीर जवान श्रीधर चव्हाण अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या.
निलंगा तालुक्यातील हाडगा (उ.) येथील सुपुत्र श्रीधर व्यंकटराव चव्हाण (३२) हे जम्मू- काश्मीरमधील श्रीनगरमध्ये कर्तव्यावर असताना सोमवारी शहीद झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी पहाटे निलंगा येथे आणण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास प्रदक्षिणा घालून पार्थिव हाडगा येथे नेण्यात आले. यावेळी शहरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करून श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, गावातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रांगोळी काढण्यात आली होती. हाडगा येथे श्रीधर चव्हाण यांचे पार्थिव आल्यानंतर ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शासकीय इतमामात शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपाधीक्षक दिनेश कोल्हे, तहसीलदार अनुप पाटील, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, पोलीस निरीक्षक बी.आर. शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक गोविंद राठोड, माजी सैनिक संघटनेचे कॅप्टन कृष्णा गिरी, काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय सोळुंके, जि.प.चे माजी अध्यक्ष पंडित धुमाळ, शिवसेनेचे अविनाश रेशमे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष सुधीर पाटील, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी नगराध्यक्ष वीरभद्र स्वामी, सरपंच आशा राजेंद्र बिरादार, पोलीस पाटील अनंत पाटील, सोसायटीच्या चेअरमन अनुसया लोभे, नायब सुभेदार के.टी. जाधव, हवालदार एस.एस. कदम, एच.आर. जाधव, गुराळे, माजी सैनिक देविदास रणखांब, रोहिदास गायकवाड, नानासाहेब बिराजदार, एकनाथ चव्हाण, राजाराम चव्हाण, महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.बी. कदम, समाधान उमरगेकर, विलास लोभे, कुमोद लोभे आदींची उपस्थिती होती.
हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना...शहीद श्रीधर चव्हाण यांना पोलीस प्रशासन व भारतीय सैन्य दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी वीर जवान श्रीधर चव्हाण अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान- जय किसान अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांचा शोकसंदेश विलास लोभे यांनी वाचून दाखविला. दोन वर्षांपूर्वी शहीद झालेले येथील जवान नागनाथ अभंग लोभे यांची आठवण काढण्यात आली.
मोठ्या भावाने दिला भडाग्नी...वीर जवान श्रीधर चव्हाण यांचे ज्येष्ठ बंधू अमर चव्हाण यांनी जड अंत:करणाने आपल्या लहान बंधूच्या पार्थिवास भडाग्नी दिला. शहीद श्रीधर यांच्या पश्चात आई संगीताताई, वडील व्यंकटराव, पत्नी राधाताई, एक वर्षीय मुलगी आस्था, भाऊ अमर व श्रीकांत असा परिवार आहे.