निलंगा तालुक्यातील उमरगा (हाडगा) येथील जवान नागनाथ लोभे हे २० डिसेंबर रोजी पहाटे शहीद झाले. त्यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी उमरगा हाडगा या मूळ गावी आणण्यात आले. दरम्यान, त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दुपारपासून निलंग्यातील मुख्य चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांचे पार्थिव निलंगा येथील चौकात आणल्यानंतर व्यापाऱ्यांनी व्यवहार व दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. यावेळी विशाल जोळदापके, माजी सभापती गोविंद शिंगाडे, माजी सभापती ईश्वर पाटील, लक्ष्मण कांबळे आदींची उपस्थिती होती. त्यानंतर हाडगा नाका येथे पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे, सभापती इरफान सय्यद, माधव फट्टे यांच्यासह नगरसेवकांनी व नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.
उमरगा (हाडगा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात नागनाथ लोभे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर शहीद लोभे यांच्या शेतात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, अविनाश रेशमे, पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित धुमाळ, सुनील माने, माजी सभापती संजय दोरवे, विलास लोभे, कुमोद लोभे, आनंदराव पाटील, जगदीश लोभे, सरपंच अमोल बिराजदार, आत्माराम लोभे, दत्ता लोभे, अजित लोभे, मिथुन दिवे, शाहूराज लोभे, माधव लोभे, हिरालाल लोभे आदी उपस्थित होते.
लष्कर, पोलीस विभागाकडून मानवंदना...
शहीद नागनाथ लोभे यांना लष्कर व पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख, आ. अभिमन्यू पवार, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, लातूर जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे संजय पवार, लष्कराच्या वतीने सुभेदार एस. डी. चौधरी, नायक सुभेदार सुपेंद्र सिंह, नायक चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाठविलेल्या शोकसंदेशाचे वाचन करण्यात आले.
रॅली काढून श्रद्धांजली...
उमरगा, निलंगा व परिसरातील युवकांनी एक हजार मोटारसायकलची रॅली काढून तर गावात शहीद नागनाथ लोभे यांची रांगोळी काढून श्रद्धांजली वाहिली. तसेच प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती.
मुलाचा सार्थ अभिमान...
माझा मुलगा देशासाठी शहीद झाल्याने मला त्याचा सार्थ अभिमान आहे, असे सांगून वृद्ध माता सुक्षमबाई यांनी हंबरडा फोडला. यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. शहीद नागनाथ लोभे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी स्वाती, मुलगा सोम (८) व सार्थक (६), चार बहिणी असा परिवार आहे.
फोटो फाईल नेम आणि कॅप्शन :
१. २३एलएचपी उमरगा१ : उमरगा हाडगा येथे शहीद जवान नागनाथ लोभे यांचे पार्थिव आल्यानंतर अंत्यदर्शन घेताना लहान मुलगा सार्थक.
२.२३एलएचपी उमरगा२ : शहीद जवान नागनाथ लोभे यांना पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदूकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
३.२३एलएचपी उमरगा४ : शहीद जवान नागनाथ लोभे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्र्शन घेताना पत्नी स्वाती लोभे व कुटूंबिय.
४.२३एलएचपी उमरगा५ : पालकमंत्री अमित देशमुख यांनी शहीद जवान नागनाथ लोभे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.