लातूर : भरउन्हात गावकऱ्यांची होणारी पायपीट पाहून बळीराजाने पिकांचे पाणी थांबवून गावास पाणी दिले. त्यामुळे पदरात पडणाऱ्या पिकांचे नुकसान सहन करीत गावची तहान भागविणाऱ्या शेतकऱ्यांचे अधिग्रहणाच्या पैशाकडे डोळे लागून होते. तब्बल दहा महिन्यांनी ३ कोटी ५६ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे गतवर्षी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवत होत्या. फेब्रुवारीपासून तर टंचाईचे चटके वाढले होते. ग्रामीण भागातील नागरिकांची घागरभर पाण्यासाठी एक-दीड किलोमीटरपर्यंत पायपीट होत होती. जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्यात येत होत्या. परंतु, उन्हामुळे जलस्त्रोत काेरडे पडत होते.
दरम्यान, पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेतले होते. मात्र, पाण्याची गंभीर स्थिती पाहून पिकांचे पाणी बंद करुन अधिग्रहणाच्या माध्यमातून गावास पाणीपुरवठा सुरु केला. त्यामुळे गावकऱ्यांची तहान भागली होती.
६९४ अधिग्रहणेजिल्ह्यात एकूण ७८६ गावे आहेत. त्यातील बहुतांश गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे ७९४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला होता.उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडू लागल्याने काही गावांसाठी टँकर सुरु करण्यात आले. ४७ टँकरच्या माध्यमातून जलपुरवठा करण्यात आला होता.
शेतकऱ्यांकडून विचारणा...गेल्या वर्षी जूनपासून पावसाला सुरुवात झाल्याने टंचाई कमी झाली. त्यानंतर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पैशाची चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, निधी नसल्याने प्रशासनाची पंचाईत झाली होती. मार्चअखेरीला अधिग्रहणापोटी ३ कोटी ५६ लाख तर टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी २ कोटी ३७ लाखांचा निधी उपलब्ध झाला.
निधी वर्ग करणे सुरूपाणीटंचाई निवारणासाठीच्या उपाययोजनांसाठी शासनाकडून तीन टप्प्यांमध्ये निधी उपलब्ध झाला आहे. तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे.