राजकुमार जाेंधळे, लातूर: आषाढी वारीच्या पालखी साेळ्यात सहभागी हाेण्यासाठी देहू-आळंदीकडे निघालेल्या शेकडाे वारकऱ्यांना वेळेवर बस उपलब्ध न झाल्याने, संतत्प वारकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातच ठिय्या आंदाेलन केले. हे आंदाेलन रात्री उशिरापर्यंत सुरु हाेते. दरम्यान, मध्यरात्रीच्यावेळी एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जादा बसेसची साेय केल्यानंतरच हे आंदाेलन वारकऱ्यांनी मागे घेतले.
लातूर जिल्ह्यातून माेठ्या प्रमाणावर वारकारी गुरुवार आणि शुक्रवारी देहू-आळंदीकडे रवाना झाले. शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नियाेजित वेळापत्रकानुसार फलाटावर लावण्यात आलेल्या लातूर-पुणे बसेसला माेठ्या प्रमाणावर प्रवाशांसह वारकऱ्यांची गर्दी झाली. दर अर्ध्या तासाला फलाटावरुन तीन बसेस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले. मात्र, बसस्थानकावर शेकडाेंच्या संख्येत वारकारी बसमध्ये जागा मिळाली नसल्याने स्थानकातच ताटकळत थांबले हाेते.
दरम्यान, जादा बसेसची व्यवस्था करावी, अशी विनंती वारकऱ्यांनी एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना, नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांकडे केली. त्यांच्या मागणीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने वारकरी संतप्त झाले. या संतप्त वारकऱ्यांनी मग रात्री १० वाजण्याच्या सुमारास बसस्थानकातील प्रांगणातच ठिय्या मांडला. ज्ञानाेबा-तुकाराम, श्री संत माउलीचा गजर करत भजन-किर्तनाला प्रारंभ झाला आणि एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा एकच गाेंधळ उडाला. या गाेंधळाची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
रात्री उशिरा धावल्या जादा बसेस...
जादा बसेस साेडण्याच्या मागणीवर वारकरी रात्री उशिरापर्यंत ठाम हाेते. परिणामी, एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली. याबाबत त्यांनी वरिष्ठांशी बाेलून जादा पाच बसेसची व्यवस्था केली. या जादा बसेसमधून रात्री उशिरा वारकरी देहू-आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाले. - हनुमंत चपटे, स्थानक प्रमुख, लातूर