लातूर : निवडणूक आयोगाने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदारांना ‘नोटा’चा अधिकार दिला. पूर्वी मतदान केंद्रात गेल्यावर कोण्या तरी एका उमेदवाराला मत देणे आवश्यक होते. तुम्हाला उमेदवार पसंत असो की नसो, त्यासाठी वेगळा कुठला पर्याय नव्हता. मागील लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवारापेक्षा ‘नोटा’ला १३ हजार ३९६ मतदारांनी पसंती दर्शविली आहे.
निवडणुकीत उमेदवार कितीही असले तरी यापैकी कोणाला तरी एकालाच पसंती द्यावी लागते. पूर्वी जेवढ्या उमेदवारांचे नाव मतपत्रिकेवर आहे, त्यापैकी एकाला मतदान द्यावे लागत होते. आता ‘नोटा’चे बटण नव्या मतदान यंत्रावर २०१४ मध्ये पहिल्यांदा आले. मतदारांना एकही उमेदवार पसंत नसेल तर तो मतदार ‘नोटा’चे बटण दाबून आपला हक्क बजावू शकतो. लातूर लोकसभेच्या निवडणुकीत २०१४ मध्ये तब्बल १८ जणांनी निवडणूक लढविली. यात भाजपा, काँग्रेस, बसपा, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी या राजकीय पक्षांसह अपक्षांचा समावेश होता. भाजपाचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांनी काँग्रेस उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला होता. निवडणुकीची चुरस या दोघांमध्येच रंगली होती. आजही काँग्रेस अन् भाजपातच चुरशीची लढत होणार आहे. बसपाचे उमेदवार दीपक कांबळे यांना २० हजार २९ तर आम आदमी पार्टीचे दीपरत्न निलंगेकर यांना ९ हजार ८२९ मते मिळाली होती. उर्वरित अपक्षांमध्ये सर्वाधिक मते सुधीर शिंदे यांना ८ हजार ६७८ होती. इतर उमेदवारांना मात्र ५ हजारांचा पल्लाही गाठता आला नाही. सर्वात कमी मते मिलिंद कांबळे (९४२) यांना होती.
१८ जणांनी लढविली होती निवडणूक१८ उमेदवारांचे नाव व त्यांचे चिन्ह नव्या मतदान यंत्रावर होते. त्यात एक बटण ‘नोटा’साठी देण्यात आले होते. २०१४ च्या या निवडणुकीत एक-दोन नव्हे तर तब्बल १३ हजार ३९६ मतदारांना यातील एकही उमेदवार योग्य वाटला नाही. या मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबून आपला अधिकार बजावला. लोकसभेच्या रणसंग्रामात भाजपाने बाजी मारली. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, भाजपाचा सामना आता चांगलाच रंगत आहे. त्यामुळे मतदानानंतर कोणाची सरशी, कोणाची पिछाडी हे स्पष्ट होईल.