- राजकुमार जाेंधळेलातूर - येथील बाजार समितीसाठी आजचा दिवस सूपर संडे ठरला असून, एकाच दिवशी तब्बल दहा हजार क्विंटलवर सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे. गत ३५ वर्षांपासूनच रेकॉर्ड मोडित काढत नवा इतिहास केला आहे. रविवारी सकाळी ११:३० वाजता सुरू झालेला सौदा रात्री ८ वाजेपर्यंत सुरूच हाेता. यावेळी सोयाबीनला प्रतिक्विंटल सर्वाधिक ४ हजार ८८१ रुपयांचा दर मिळाला. हा दर लातूर जिल्ह्यातील इतर बाजार समितीच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे औसा बाजार समितीचे सचिव संतोष हुच्चे यांनी सांगितले.
औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९८२ मध्ये झाली आहे. रविवारचा दिवस बाजार समितीसाठी विक्रमी ठरला आहे. योग्य दर, पारदर्शक व्यवहार हाेत असल्याने औशासह तालुका, उस्मानाबाद, सोलापूर आणि कर्नाटकातून शेतमाल विक्रीला येतो. दोन राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या औसा बाजारपेठेत खरेदीदाराचा आलेख वाढत असल्याने आवक वाढत आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीनसह इतर शेतमालाची आवक सुरू झाली आहे. रविवारी गत ३५ वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक करणारी आवक झाली आहे. रविवारी सकाळपासूनच बाजार समितीच्या आवारात वाहनांची गर्दी होती. दुपारी ही गर्दी वाढली अन् वाहन थांबवायलाही जागा मिळत नव्हती. व्यापाऱ्यांसह खरेदीदारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत हाेता. सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांनीही काढलेले सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणल्याने मोठी गर्दी झाली. परिणामी, जागेच्या कमतरतेमळे अनेक वाहनांना जागाही मिळत नव्हती.
औशाचे आ. अभिमन्यू पवार यांच्या आवाहनाला प्रतिसादऔसा बाजार समितीला चांगले दिवस यावेत, यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल येथे विक्री करावा. ज्यातून बाजार समितीची उलाढाल वाढेल. त्यांचा फायदा सर्वांनाच होईल, असे अवाहन आ. अभिमन्यू पवार यांनी केले हाेते. यासाठी त्यांनी येथील विकासकामांना २ कोटी ५ लाखांचा निधीही दिला. लवकरच बाजार समितीचा कारभार पेपरलेस होईल. शिवाय, वीजनिर्मितीही करणार असून, शेतकऱ्यांसाठी बाजार समिती तारण योजना राबवत आहे, असे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्रा. भीमाशंकर राचट्टे यांनी सांगितले.